Home महाराष्ट्र मराठी ही केवळ संवादाची नव्हे, तर रोजगाराची भाषा व्हावी – उपमुख्यमंत्री एकनाथ...

मराठी ही केवळ संवादाची नव्हे, तर रोजगाराची भाषा व्हावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Marathi should not only be the language of communication, but also of employment – ​​Deputy Chief Minister Eknath Shinde

सातारा : मराठी भाषा हा आपल्या संस्कृतीचा आत्मा, अस्मिता, अभिमान आहे.  ही भाषा संपली तर आपले अस्तित्व संपेल याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. मराठी केवळ संवादाची भाषा न राहता ती रोजगाराची भाषा झाली पाहिजे. तिचे व्यावसायिक महत्त्व टिकवून ठेवत मराठीचे वैभव, दरारा आणि मराठीचा दिमाख कायम ठेवणे हे आपले केवळ कर्तव्य नसून ती अत्यंत पवित्र अशी जबाबदारी आहे. या साहित्य संमेलनाला शासनाने 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. यापुढेही अशा साहित्य संमेलनांना निधी कमी पडणार नाही, हे पाहणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे भाषेच्या विकासासाठी व संवर्धनासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सातारा येथे १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप कार्यक्रम उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी होते. यावेळी  उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, आमदार महेश शिंदे, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट, भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उद्योजक, मंडळाचे कार्यवाहक सुनिताराजे पवार व संमेलनाचे संरक्षक फरोख कूपर आदी उपस्थित होते.

संमेलनाचे अध्यक्ष श्री. विश्वास पाटील म्हणाले, हे संमेलन साताऱ्याच्या वैभवात भर टाकणारे असे झाले. श्रीमंत छत्रपती शंभूराज यांच्या हत्येनंतर संभाजी पुत्र शाहू महाराज यांनी केलेला संघर्ष त्यांनी दाखवलेला संयम, त्यांच्या जीवनात महत्त्वाचे प्रसंग त्यांनी उद्धृत केले. शिवाजी महाराजांचे पिता शहाजी महाराज यांची समाधी सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.  मराठी भाषेतील रसग्रहण, अलंकार, विनोद नवीन पिढीला कळावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. सोशल मीडिया हा सोशल बिघाडीया बनत चाललेला आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. समाजातील संहिष्णुता संपत चालली आहे. हे असहिष्णू वातावरण चिंताजनक आहे असे सांगून मराठी भाषेच्या सांस्कृतिक, अस्तित्वासाठी लढाव्या लागणाऱ्या सर्व लढाया लढू अशी ग्वाही त्यांनी दिली. छत्रपती संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराज व छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्यावर मौलिक संशोधन करण्याचा शब्दही त्यांनी दिला.

ज्येष्ठ साहित्यिक श्री. चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत त्यांच्याप्रति आदर व्यक्त करुन महाराष्ट्र शासन व येथील सर्वसामान्य रसिक मराठी भाषेला देत असलेला आदर पाहून आशावाद व्यक्त केला. महाराष्ट्राची व मराठी भाषेची भरभराट होवो. अशा शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. श्री. जोशी म्हणाले, हे साहित्य संमेलन साहित्य, वाचक, रसिक केंद्रित झाले. या संमेलनात, सामाजिक, राजकीय अशी सर्वच मुळे खोलवर गेली आहेत. या संमेलनात साहित्य महामंडळाने मराठी भाषेचा कळवळा ठामपणे मांडला आहे. या संमेलनाची स्पंदने दीर्घकाळ रसिकांमध्ये रेंगाळत राहतील. त्यातून अनेक साहित्यिक निर्माण होतील. शंभरावे साहित्य संमेलन पुण्यात होणार असून. पहिले साहित्य संमेलनही पुण्यात झाले होते. या‍ निमित्ताने एक वर्तुळ पूर्ण होईल. शंभराव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दुबईत विशेष साहित्य संमेलन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संमेलनाला भरीव मदत करणारे, फरोख कुपर, परांजपे ॲाटोकास्टचे श्री. ऋषीराज यांच्यासह जिल्हाधिकारी श्री. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन, पोलीस अधीक्षक श्री. दोशी, नगर प्रशासन अधिकारी श्री. बापट, डॉ. राजेंद्र सरकाळे, राजेंद्र लाखे, पद्माकर कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

साहित्य संमेलन समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, सूत्रसंचालन स्नेहल दामले व साहित्य संमेलनात सुनिताराजे पवार यांनी विविध ठराव मांडले.

error: Content is protected !!
Exit mobile version