Home महाराष्ट्र मेळघाट हाट :दुर्गम भागातील महिलांच्या उत्पादनांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

मेळघाट हाट :दुर्गम भागातील महिलांच्या उत्पादनांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

Melghat Haat: Products made by women from remote areas get a rightful platform

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट क्षेत्रातील दुर्गम भागात राहणाऱ्या स्वयंसहाय्यता महिला बचतगटांच्या श्रमाला आणि त्यांच्या कौशल्यातून साकारलेल्या उत्पादनांना ‘मेळघाट हाट’ विक्री केंद्राच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ प्राप्त झाले आहे. महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सशक्तीकरणासाठी राबविण्यात आलेल्या अशा अभिनव उपक्रमांना सर्व स्तरावरून प्रोत्साहन मिळत आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे सायन्सकोर प्रांगणालगत आधुनिक महिला बचत गट उत्पादन विक्री केंद्र सुरु आहे. हे विक्री केंद्र 5 जानेवारी 2025 पासून नागरिकांच्या सेवेत आहे.

मेळघाट हाटच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रातील उत्पादित साहित्याला प्रथमच शहराच्या मध्यवस्तीत हक्काचे विक्री केंद्र मिळाले आहे. या मॉलच्या माध्यमातून उत्पादित वस्तूंची थेट ग्राहकांना विक्री होत असल्याने मध्यस्थांची साखळी मोडीत निघत असून बचत गटातील महिलांच्या उत्पन्नात विशेष वाढ होत आहे. या ठिकाणी ग्राहकांसाठी मेळघाटातील वैविध्यपूर्ण वनौषधी, बांबूंपासून बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, रानमेवा आणि शुद्ध मध यासारख्या दुर्मिळ वस्तूंची मोठी श्रेणी खरेदीसाठी उपलब्ध आहे. आदिवासी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला बचत गटांना सातत्याने प्रोत्साहन देऊन आदिवासी क्षेत्रात जास्तीत-जास्त बचत गटांचे जाळे निर्माण करणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. महिलांची कला-कौशल्याला योग्य दिशा मिळावी तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादनात वैविध्य आणून त्यांना मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मेळघाट हाटची निर्मिती करण्यात आली आहे.

विक्रीसाठी आणलेल्या साहित्यांना राष्ट्रीय स्तरावर योग्य भाव मिळण्यासाठी विक्री साहित्याचे उत्तम मार्केटिंग, आकर्षक पॅकिंग व प्रभावी ब्रँडिंग करणे ही काळाची गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन महिला बचत गटांना या तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या उत्पादित मालाला राज्यासह संपूर्ण देशात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मेळघाटातील धारणी तसेच चिखलदरा तालुक्यातील स्वयंसहाय्यता महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी, याच हेतूने हे मेळघाट हाट विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच छताखाली मेळघाटातील 47 प्रकारच्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रथम टप्प्यात एकूण 60 स्वयंसहाय्यता महिला बचत गटांच्या उत्पादनांचा यात समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये प्रामुख्याने बांबूपासून निर्मित विविध उत्पादने, तृणधान्यांमध्ये सावा, कुटकी, ज्वारी, बाजरी तसेच कडधान्य, गहू, लाल तांदूळ, तूर दाळ, विविध प्रकारची लोणची, चिखलदऱ्याची जगप्रसिद्ध कॉफी, मध आणि शुद्ध तूप यांचा समावेश आहे. याशिवाय गृहशोभेच्या वस्तू आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून पौष्टिक खाद्यान्ने देखील येथे उपलब्ध आहेत. या केंद्राला आधुनिक मॉलचे स्वरूप देण्यात आले असून, येथे स्वतंत्र गोदाम, पॅकेजिंग आणि लेबलिंग युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहकांना खरेदीचा एक वेगळा अनुभव मिळत आहे.

खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त मेळघाट हाट येथे ‘खादी महोत्सवा’चेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी कस्तुरबा सोलर खादी महिला समिती अंतर्गत धारणी तालुक्यातील महिलांनी कापसापासून सूत आणि सुतापासून कापड ते गारमेंटपर्यंतच्या उत्पादनांची निर्मिती करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या क्लस्टरतर्फे महिलांनी उत्पादीत केलेला माल खादी महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. विकेंद्रित सोलर चरखा समूहाच्या कार्यक्रमांतर्गत लाभार्थी महिलांनी तयार केलेली दर्जेदार खादी आणि सौर खादी उत्पादने येथे सवलतीच्या दरात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली होती, ज्याला अमरावतीकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमामुळे मेळघाटातील आदिवासी महिला भगिनींच्या बचत गटांना विक्री आणि विपणनासाठी एक सक्षम प्लॅटफॉर्म मिळाला असून, यामुळे महिला सक्षमीकरणासह आदिवासी क्षेत्रातील आर्थिक विकासाला निश्चितच मोठी गती मिळणार आहे.

– अपर्णा यावलकर

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती

error: Content is protected !!
Exit mobile version