पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे आणि ऐतिहासिक शासकीय रुग्णालय असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सी.पी.आर.), कोल्हापूर येथील विविध नूतनीकरण व आधुनिकीकरणाच्या कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून करण्यात आले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
रुग्णालयाच्या ऐतिहासिक वारसास्थळाचे जतन करत रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून विविध कामे करण्यात आली असून, त्यासाठी आतापर्यंत ६०० कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यावेळी सीपीआर रुग्णालयाच्या ऐतिहासिक वाटचालीसह नूतनीकरण व आधुनिकीकरणाच्या कामांवर आधारित लघुपट दाखविण्यात आला. तसेच रुग्णालयाची प्रतिमा मान्यवरांना भेट देण्यात आली. यावेळी राजर्षी शाहू महाराज आणि राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री स्व. दिग्विजय खानविलकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
या नूतनीकरणामध्ये रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची कमान, मॉड्युलर बर्न आयसीयू, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, मॉड्युलर आयसीयू, एमआरआय विभाग, अत्याधुनिक निदान व उपचार सुविधा, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा शेड, तसेच विविध वैद्यकीय विभागांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे सीपीआर रुग्णालयातील आरोग्यसेवांची क्षमता आणि गुणवत्ता अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
