
सीटी स्कॅन आणि पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांच्या प्रगतीचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सविस्तर आढावा घेतला. मुंबई आणि नागपूर क्लस्टरमधील विविध प्रकल्पांमध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना रुग्णांना दर्जेदार व अत्याधुनिक निदान सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
एमआरआय, सीटी स्कॅन आणि पीईटी सीटी स्कॅन या सुविधा राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी शासन आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे. रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सुविधा विस्तार, देखभाल आणि कार्यक्षम अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात येत आहे. सर्वसामान्य रुग्णांना गुणवत्तापूर्ण आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध होतील, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.
बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी, ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, दूरदृष्य प्रणालीद्वारे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे, छत्रपती संभाजीनगर, मिरज, कोल्हापूर, बारामती, पुणे, नांदेड, लातूर, सोलापूर, चंद्रपूर, अंबाजोगाई, सिंधुदुर्ग, नागपूर, यवतमाळ, अकोलाचे अधिष्ठाता उपस्थित होते.