Home टेक न्युज नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस” नामकरणासाठी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांचा पुढाकार

नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस” नामकरणासाठी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांचा पुढाकार

0
Mumbai Deputy Mayor Sanjay Ghadi takes the initiative to rename the terminus "Nana Shankarshet Mumbai Terminus."

मुंबई(प्रतिनिधी):-आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांच्या 161 व्या पुण्यतिथीनिमित्त आज मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून  भावपूर्ण पुण्यस्मरण करण्यात आले. या प्रसंगी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामकरण ‘नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस’ करण्यासाठी पालिका व प्रशासकीय पातळीवर विशेष पुढाकार घेणार असल्याचे जाहीर केले. दिवसभरात मुंबईतील नानांच्या स्मृतींशी जोडलेल्या विविध ऐतिहासिक ठिकाणी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि नानाप्रेमींनी एकत्र येत त्यांना अभिवादन केले:
नाना शंकरशेट चौक नाना शंकरशेट चौकातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी महापालिकेच्या ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंके आणि स्थानिक नगरसेवक ॲड. गौरंग जव्हेरी प्रामुख्याने उपस्थित होते. मध्य रेल्वे मुख्यालय: मध्य रेल्वेच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागावर असलेल्या नानांच्या ऐतिहासिक कोरीव पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रेल्वे क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यात आला. मुंबई महानगरपालिका सभागृह:  महानगरपालिका  मुख्यालयातील सभागृहात असलेल्या नाना शंकरशेट यांच्या तैलचित्रास उपमहापौर संजय घाडी, अतिरिक्त आयुक्त संजोग कबरे आणि महापालिका सचिव मनोज कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
एशियाटिक सोसायटी: एशियाटिक सोसायटी येथील नानांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि सर्व समिती सदस्यांनी उपस्थित नानाप्रेमींचे उत्साहात स्वागत केले. या पुण्यस्मरण सोहळ्यास अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, सरचिटणीस ॲड. मनमोहन चोणकर, चंद्रशेखर दाभोळकर, दिनकर बायकेरीकर, डॉ. विवेक रायकर, रविंद्र माहिमकर, विजय पितळे, दिलीप मालांडकर यांसह शंकरशेट कुटुंबीय आणि मुंबईतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.