Home क्रीडा पुरस्कारविजेत्या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन युवक खेळांकडे वळतील : उपमुख्यमंत्री

पुरस्कारविजेत्या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन युवक खेळांकडे वळतील : उपमुख्यमंत्री

(मुंबई) क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झालेले श्रीकांत वाड, दिलीप वेंगसरकर, आदिल सुमारीवाला या मान्यवरांचं उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक- जिजामाता पुरस्कार,  शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार,  शिवछत्रपती साहसी क्रीडा पुरस्कार, दिव्यांग बांधवांसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज क्रीडा क्षेत्रातील 117 मान्यवरांना जाहीर झाले. या सर्व खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शकांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू, मार्गदर्शकांमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा गौरव !

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात महाराष्ट्राचा गौरव वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं, दिलेल्या योगदानाचा महाराष्ट्राला अभिमान आहे. या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन राज्यातील युवक अधिकाधिक संख्येने खेळांकडे वळतील, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करुन महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम राखतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version