जागतिक संधींकडे नंदुरबारची वाटचाल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या “District Outreach Programme” अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
Nandurbar's journey towards global opportunities: District level workshop under the Ministry of External Affairs' "District Outreach Programme" concluded
(नंदुरबार) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने “District Outreach Programme” अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत करण्यात आले.
जिल्ह्यातील उद्योजक, विद्यार्थी, बचत गट, निर्यातदार तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना जागतिक स्तरावरील संधींबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी श्री. स्वप्नील पाटील (Indian Foreign Service) यांनी उपस्थितांना विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये व्यापार व गुंतवणूक संधी, पर्यटन व सांस्कृतिक देवाणघेवाण, भारतीय प्रवासी समुदायाशी संवाद, परदेशी रोजगाराच्या संधी, कौशल्याधारित रोजगार, पासपोर्ट व वाणिज्य दूतावास सेवा तसेच जिल्हास्तरीय भागधारकांसाठी उपलब्ध जागतिक संधींचा समावेश होता.
जिल्ह्यातील लघु, मध्यम तसेच मोठ्या उद्योजकांना निर्यात क्षेत्रातील संधी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शासनाच्या विविध प्रोत्साहनपर योजनांविषयी श्री. निलेश गायकवाड, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र नंदुरबार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी CMEGP, PMEGP, निर्यात प्रोत्साहन योजना तसेच MIDC मधील सुविधा यांची माहिती देत उद्योजकांना जागतिक बाजारपेठेकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले.
जिल्ह्यातील स्थानिक उत्पादने, कृषी प्रक्रिया उद्योग, महिला बचत गट आणि युवा उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
“लोकल ते ग्लोबल” या संकल्पनेला बळ देत नंदुरबार जिल्ह्यातील उद्योग, कौशल्य आणि उत्पादनांना जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि विविध विभागांच्या समन्वयातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.