Home नंदुरबार जिल्हा तृतीयपंथी व्यक्तींसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 14427 सुरू

तृतीयपंथी व्यक्तींसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 14427 सुरू

National helpline number 14427 launched for transgender people

(नंदुरबार) समाजाच्या मुख्य प्रवाहात तृतीयपंथी व्यक्तींचा समावेश व्हावा आणि त्यांना सन्मानाने व सुरक्षिततेने जगता यावे, यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 14427 सुरू केला असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

हेल्पलाइनद्वारे मिळणारी मदत:

14427 हा 24 तास उपलब्ध असणारा क्रमांक तृतीयपंथी व्यक्तींना विविध समस्या, तक्रारी आणि मार्गदर्शनासाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ प्रदान करतो. या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास खालील बाबींमध्ये मदत मिळते:

• भेदभाव, छळ किंवा हिंसाचाराबाबत तक्रार नोंदवणे.

• आरोग्य, मानसिक समुपदेशन व उपचारांविषयी मार्गदर्शन.

• शिक्षण, शिष्यवृत्ती व कौशल्य प्रशिक्षणाबाबत माहिती.

• रोजगार व स्वयंरोजगार योजनांची माहिती.

• ओळखपत्रे, ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र व इतर शासकीय सेवांबाबत मार्गदर्शन.

• निवास व संरक्षणगृहांबाबत माहिती.

गोपनीयता आणि विश्वासार्हता:

या हेल्पलाईनवर येणाऱ्या सर्व कॉल्सची पूर्ण गोपनीयता राखली जाते. प्रशिक्षित समुपदेशक संवेदनशीलतेने तक्रारी ऐकून घेतात आणि आवश्यकतेनुसार संबंधित विभाग, पोलीस प्रशासन किंवा आरोग्य सेवा यंत्रणांशी समन्वय साधतात.

सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांनी या हेल्पलाइनची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. कोणत्याही अडचणीत, अन्यायाच्या प्रसंगी किंवा मार्गदर्शनासाठी तृतीयपंथी व्यक्तींनी निर्भयपणे 14427 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहनही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, श्री. वसावे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version