Home महाराष्ट्र जागतिकस्तरावर अस्थिरतेच्या काळात निसर्गोपचार आवश्यक – डॉ. धनलाल शेंद्रे

जागतिकस्तरावर अस्थिरतेच्या काळात निसर्गोपचार आवश्यक – डॉ. धनलाल शेंद्रे

0
जागतिकस्तरावर अस्थिरतेच्या काळात निसर्गोपचार आवश्यक – डॉ. धनलाल शेंद्रे
Naturopathy is essential in times of global instability – Dr. Dhanlal Shendre

नागपूर :आज जागतिकस्तरावर आपण अस्थिरतेचा अनुभव घेत आहोत. त्यामुळे वाढणारे ताण- तणाव अनेक आजारांना आमंत्रण देत आहेत. अशा काळात निसर्गोपचार आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा परिषद नवी दिल्लीचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. धनलाल शेंद्रे यांनी केले. माहिती आणि जनसंपर्क संचालक कार्यालयातर्फे आयोजित विशेष उपक्रमात ते बोलत होते.

निसर्गोपचार ही फक्त एक चिकित्सा पद्धती नाही, तर ती जीवनपद्धती असल्याचे सांगून डॉ. शेंद्रे म्हणाले की, हवा, पाणी, जमीन असे सारेच आज दूषित झाले असल्याने आजारांचे प्रमाणही वाढले आहे. आपली आधुनिक जीवनशैली त्यासाठी पूरक ठरत आहे. निसर्गोपचार ही रोगमुक्त करणारी चिकित्सा पद्धत आहे. सर्व आजार एक व सर्व आजारांचे कारण एक, हे या पद्धतीचे सूत्र आहे. निसर्गोपचारात यज्ञ चिकित्साही केली जाते. काहींनी याला धार्मिक स्वरूप दिले मात्र ही चिकित्सा पद्धती आहे व अनेक मानसिक आजार, अनिद्रा, मेंदू विकार यावर यज्ञ चिकित्सा उपयोगी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जेवण झाल्यानंतर किमान तीन तास झोपू नका, रात्री हलका आहार घ्या, सकाळी नाश्ता म्हणून फळे खा, भोजनाच्या पाऊण तास आधी आणि भोजनानंतर एक तासाने पाणी प्या, आहारात भात, पोळी कमी आणि भाजी अधिक घ्या, झोपण्याच्या किमान दोन तास आधीच मोबाइलपासून दूर व्हा, अशा निरोगी आयुष्याच्या टिप्सही त्यांनी दिल्या. आजार होऊच नये यासाठी ही पद्धती आहे. त्यामुळे निसर्गोपचाराचा अवलंब केला, तर डॉक्टरांकडे जायची वेळ येणार नाही, असेही शेंद्रे यांनी सांगितले.

माणसाला आयुष्यात पद, पैसा प्रतिष्ठा मिळेल, पण त्याचबरोबर मन आणि शरीर सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यासाठी निसर्गोपचार परिणामकारक असल्याचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी डॉ. मुळे यांनी डॉ. शेंद्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन सहायक संचालक पल्लवी धारव यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here