Home महाराष्ट्र स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत

स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत

Need to adopt naturopathy for a healthy India – Governor Acharya Devvrat

पुणे: निसर्गोपचार, आयुर्वेद, आपली पूर्वीची जीवनशैली, नैसर्गिक शेती तसेच आपल्या जीवनमूल्यांना पुन्हा अवलंबल्यास स्वस्थ भारत बनवू शकू, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला. या कामात निसर्गोपचार वैद्यक व्यवसायी, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे अंतर्गत येवलेवाडीतील  निसर्गग्राम येथे आयोजित आठव्या निसर्गोपचार दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आयुष मंत्रालयाच्या सहसचिव डॉ. कविता जैन, पोस्ट मास्तर जनरल सुचिता जोशी, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणेचे प्रभारी संचालक अमरेंद्र सिंग आदी उपस्थित होते.

भारत सरकारने आयुष मंत्रालय स्थापन करून भारताच्या प्राचीन चिकित्सा पद्धतींना पुन्हा जिवंत करण्याचे मोठे अभियान चालविले आहे, असे सांगून राज्यपाल श्री. देवव्रत म्हणाले, आपल्याला निसर्गाकडे पुन्हा परतण्याची गरज आहे. पूर्वी विषयुक्त शेती नसल्याने आजारांपासून दूर होतो.  चाळीसेक  वर्षापूर्वी आपली जीवनशैली चांगली होती तेव्हा आजारांपासून आपण दूर होतो. आज बदललेल्या जीवनशैलीमुळे  कॅन्सर, हृदयरोग, किडनीचे विकार, मधुमेह आदी आजार जडले आहेत. त्यापासून दूर रहायचे असेल तर निसर्गोपचार आणि नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे. आपले अन्नसेवन शुद्ध असल्याशिवाय उपचार लाभदायी होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.

महात्मा गांधी यांनी निसर्गोपचार पद्धतीचा स्वतःवर अवलंब केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की ही उपचारपद्धती सुरक्षित, खर्चिक नसलेली तसेच आजारापासून दूर ठेवणारी असल्याने भारताच्या लोकांना निसर्गोपचाराशी जोडणे आवश्यक आहे. गांधीजींनी निसर्गाकडे परतण्याचे काम केले. पुण्यात ते राहिले तसेच देशात स्थापन केलेल्या आश्रमांशी निसर्गोपचाराला जोडण्याचे काम केले, असेही राज्यपाल म्हणाले.

मानवाकडून निसर्गाचा विनाश होत असल्यामुळे जागतिक तापमान वाढ, अतिवृष्टी, अनावृष्टी, भूस्खलन, भूकंप, वादळे आदी आपत्तीत वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा निसर्गाशी जोडून घेण्याची गरज आहे. निसर्गाशी लोकांना जोडण्याचे काम तसेच निसर्गोपचाराशी संबंधित काम करत असल्याबद्दल असल्याबद्दल राज्यपालांनी या क्षेत्रातील घटकांचे अभिनंदन केले.

राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले, निसर्गोपचाराच्या विकासासाठी तसेच त्यासाठी केंद्रीय परिषद स्थापन करण्याबाबत या क्षेत्रातील घटकांकडून सूचना येत असून त्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.

ते पुढे म्हणाले, प्राचीन निसर्गोपचार पद्धतीचे स्मरण देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी आयुष मंत्रालयांतर्गत भारताच्या सर्व चिकित्सा पद्धतींचा दिवस साजरा केला जातो. १८ नोव्हेंबर १९४५ रोजी महात्मा गांधी यांनी इंडिया नेचर क्युअर फाउंडेशन ट्रस्टच्या आजीवन अध्यक्षपदाच्या करारावर स्वाक्षरी केली होती. त्यामुळे हा दिवस निसर्गोपचार दिवस म्हणून साजरा करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.

आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे लठ्ठपणा ही जगभरातील मोठे संकट बनले आहे. हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आदी अनेक आजारांना ते कारण ठरले आहे. योग आणि नैसर्गिक जीवनशैली, निसर्गोपचार, संतुलित आहार यावर उपयुक्त आहे. यासह मानसिक तणाव कमी करणे तसेच पचनशक्ती सुधारल्यास लठ्ठपणावर मात करता येऊ शकेल, असेही श्री.जाधव म्हणाले.

महाराष्ट्रात राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था आपल्या आदिवासी समाजाला जनजातीय केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सुविधा प्रदान करत आहे. राज्य शासनाने जागा दिल्यामुळे आंबेगाव तालुक्यात गोहे बुद्रुक येथे राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या जनजातीय केंद्राची स्थापना केली आहे. राज्यातील विविध आदिवासी क्षेत्रात अशी केंद्रे स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढे यावे, असेही ते म्हणाले.

अमरेंद्र कुमार यांनी प्रास्ताविकात संस्थेने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी निसर्गोपचाराशी संबंधित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धांच्या विजेत्या महाविद्यालय, वैद्यकीय व्यवसायी, उत्कृष्ट विद्यार्थी यांना पुरस्कार देण्यात आला.

कार्यक्रमाला राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र, निसर्ग ग्राम येथील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी यांच्यासह निसर्गोपचार वैद्यकीय व्यवसायी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version