नंदुरबार : आदिवासी समाजाची समृद्ध कला, संस्कृती आणि अस्मिता अधिक व्यापकपणे समाजासमोर यावी, या उद्देशाने ‘बिरसा कला संगम’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली असून, या माध्यमातून आदिवासी कलाकारांचा सन्मान, ओळख आणि संधी वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन डॉ. अशोक वुईके यांनी केले.नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आदिवासी लोककलाकार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास आमदार आमशा पाडवी, नाशिक आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अनय नांवदर (तळोदा), चंद्रकांत पवार (नंदुरबार), प्रमोद पाटील (धुळे) प्रगती प्रतिष्ठान जव्हारचे विरेंद्र चंपानेरकर, कल्पेश डोके, रुढी परंपरा जाणीव जागृती मंच विसरवाडीचे ईश्वर गावीत, सुर्यदर्शन मोहनदादा वळवी संस्थेचे संदीप वळवी, निलेश माळी आदि मान्यवर उपस्थित होते. विविध आदिवासी लोककलाकार, सांस्कृतिक कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते.40 हजार कलाकारांची नोंदणी;अभूतपूर्व प्रतिसाद
मंत्री डॉ. वुईके म्हणाले की, आदिवासी कलाकारांना खुले व्यासपीठ मिळावे यासाठी ऑनलाईन माहिती व नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाला देशभरातून तब्बल 40 हजार कलाकारांनी नोंदणी करून प्रतिसाद दिला, हे या मोहिमेचे यश दर्शवते.
संस्कृतीशी नाळ जोडल्याशिवाय समाज समजणार नाही
“जोपर्यंत तळागाळातील आदिवासी माणसाशी नाळ जोडली जाणार नाही, तोपर्यंत आदिवासी समाज समजून घेता येणार नाही,” असे सांगत त्यांनी, या संवाद माध्यमातून आपण थेट समाजात आलो असल्याचे स्पष्ट केले. गौरवशाली आदिवासी संस्कृती जपणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भगवान बिरसा मुंडांची 150 वी जयंती विशेष पद्धतीने
यावर्षी भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असून, आदिवासी समाजाची अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी मंत्री म्हणून आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वतंत्र बजेट व गरजेच्या योजना
आदिवासी विकास विभागासाठी स्वतंत्र सांस्कृतिक बजेट तयार करण्यात यावे, अनावश्यक योजना बंद करून आदिवासी समाजासाठी आवश्यक व उपयुक्त योजना आणण्याचा मानस असल्याचे मंत्री डॉ. वुईके यांनी स्पष्ट केले. “संस्कृती विनाशाकडे गेली, तर समाजाचे अस्तित्व धोक्यात येईल,”असा इशाराही त्यांनी दिला.
पोषाख, वाद्ये व साहित्याला आर्थिक पाठबळ
आदिवासी लोककलेतील पोषाख, वाद्ये व साहित्य यासाठी न्यूक्लियस बजेट अंतर्गत आवश्यक साहित्य वितरित करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.
बोलीभाषेत शिक्षण व सांस्कृतिक संग्रहालय
आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असून, येणाऱ्या काळात टीआरटीच्या माध्यमातून भाषा व संस्कृती जतन करणारे संग्रहालय उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. मातृभाषेत पुस्तके व शिक्षण नव्या शैक्षणिक धोरणात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अपप्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन
आदिवासी समाजाच्या इतिहासाला नष्ट होऊ देऊ नका, अपप्रचाराला बळी न पडता वास्तव स्वीकारा, असे आवाहन करत “शेवटच्या कलाकारालाही त्याच्या सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे,” असे मंत्री डॉ. वुईके यांनी ठामपणे सांगितले. दैव-दैवत आणि अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले. यावेळी विविध स्पर्धेतील विजेते ग्रुप व कलावंत, विद्यार्थी यांचा सत्कार मंत्री डॉ. वुईके यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोककला व संस्कृतीच्या जतन-संवर्धनाला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थित कलावंत व अभ्यासकांमधून व्यक्त करण्यात आली.
