Home शेती विविध कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन संगणक प्रणालीची सुरुवात; अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ व...

विविध कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन संगणक प्रणालीची सुरुवात; अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक

Online computer system launched for various agricultural awards; application process made easier and more transparent

महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत विविध कृषी पुरस्कारांसाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. पुरस्कार प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य असून दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती व संस्थांचा सन्मान राज्य शासनाकडून करण्यात येतो. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार यांचा समावेश आहे. हे पुरस्कार माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येतात.

ऑफलाईन पद्धतीऐवजी डिजिटल प्रणाली:

यापूर्वी पुरस्कार प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात होते. प्रस्ताव तयार करण्यासाठी छपाई, झेरॉक्स व इतर खर्च करावा लागत असल्याने अनेक इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करणे कठीण होत होते. तसेच प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलन प्रक्रियेला अधिक वेळ लागत होता.

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पुरस्कार प्रक्रियेला वेळबद्ध, सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या संकेतस्थळावर https://krishi.maharashtra.gov.in या ठिकाणी “कृषी पुरस्कार” या टॅबमध्ये उपलब्ध आहे.

ऑनलाईन प्रणालीचे फायदे:

शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज सादर करता येणार.

चार प्रती तयार करण्याचा वेळ व खर्च वाचणार.

एकदाच अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची गरज नाही.

अर्ज कोणत्या टप्प्यावर आहे याची माहिती सहज उपलब्ध.

छपाई, झेरॉक्स, प्रवास व पोस्ट खर्चात बचत.

मा. आयुक्त कृषी यांनी सर्व इच्छुक शेतकरी, संस्था, व्यक्ती आणि गटांना सन २०२५ पासूनच्या विविध कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे, तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कृषी विभाग महाराष्ट्र शासन @agriculture_gom

#collectorofficenandurbar#KrishiVibhag#agriculture

error: Content is protected !!
Exit mobile version