महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव दर्शविणारी 101 अनमोल भेटवस्तूचा समावेश
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रासह देशभरातून भेट म्हणून प्राप्त झालेल्या 1,300 हून अधिक स्मृतिचिन्हांचा समावेश असलेल्या पंतप्रधान स्मृतिचिन्हे ई-लिलाव 2025 ची सातवी आवृत्ती सध्या सुरू आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय आधुनिक कला दालनाने आयोजित केलेला हा ई-लिलाव 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत www.pmmementos.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहे.
या लिलावामध्ये महाराष्ट्रातील विविध कार्यक्रम आणि मान्यवरांनी पंतप्रधानांना भेट दिलेल्या 101 भेटवस्तूंचा समावेश आहे. या भेटवस्तू महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि कलात्मक वारसा यांचे प्रतिक आहेत. या भेटवस्तूंपैकी काही अत्यंत लक्षवेधी आहेत. यामध्ये: नागपूरजवळील कोराडी मातेची दोन रंगांनी सजवलेली हस्तनिर्मित लाकडी मूर्ती, जी स्थानिक कारागिरांच्या कौशल्याचे आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे.
वारली शैलीतील नाजूक चित्रांनी सजवलेले बांबूपासून बनवलेले तारपा वाद्य, जे महाराष्ट्राच्या आदिवासी संस्कृतीतील कथात्मक कला आणि सलोख्याचे दर्शन घडवते.नाशिकच्या श्री काळाराम मंदिरातील चांदीचा राम दरबार, जो फायबर काचेच्या पेटीत मांडलेला असून, प्रभू श्री राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या सुबक शिल्पातून भक्ती आणि कारागिरीचे उत्कृष्ट संगम सादर करतो.
२०१९ पासून सुरू झालेल्या या ई-लिलावा मुळे भारत आणि परदेशातील नागरिकांना पंतप्रधानांना भेट दिलेल्या दुर्मिळ वस्तू खरेदी करण्याची अनोखी संधी मिळते. हा सर्व निधी नमामी गंगे प्रकल्पासाठी वापरला जातो, ज्यामुळे गंगा नदीचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन केले जाते. आतापर्यंत या लिलावांमधून तब्बल ५० कोटी रुपयांहून अधिक निधी जमा झाला आहे.
अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी www.pmmementos.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या. जास्तीत जास्त संग्राहक, कलाप्रेमी नागरिकांनी या लिलावात सहभागी व्हावे असे आवाहन केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष -213
एक्स वर आम्हाला फॉलो करा:
https://x.com/MahaGovtMic /https://x.com/micnewdelhi /https://x.com/MahaMicHindi
