Home महाराष्ट्र परभणीतील शेतकऱ्यांना पाणी उपलब्धता वाढविण्यास प्राधान्य द्यावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

परभणीतील शेतकऱ्यांना पाणी उपलब्धता वाढविण्यास प्राधान्य द्यावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

Priority should be given to increasing water availability to farmers in Parbhani – Minister of State Meghna Sakore-Bordikar

मुंबई : शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसाठा वाढवणे, सिंचन क्षमता विस्तार करणे आणि पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिले.

निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संजय चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत भूजल पातळी वाढविण्यासाठी व्यापक उपाययोजनांची आवश्यकता. अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाटाचे पाणी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर , पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी तलाव, तळी, धरणे आणि कालव्यांच्या दुरुस्ती व सक्षमीकरणाची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात त्यांनी दिल्या.

पुराचे पाणी प्रभावीपणे साठविण्याचे नियोजन

दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पावसाचे आणि पुराचे पाणी वाहून जाते यावर उपाय म्हणून नद्या व तलावांचे खोलीकरण, नवीन चेकडॅम व बंधारे उभारणे, नाला बांधकाम सुधारणा तसेच पुराचे पाणी प्रभावीपणे साठविण्याचे नियोजन करावे.

पूरनियंत्रणाची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत

अनेक गावांना नदीच्या पुरामुळे धोका निर्माण होत असल्याने अशा ठिकाणी तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. गावांची सुरक्षा महत्त्वाची असून पूरनियंत्रणाची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

कामांचे नियमित ऑडिट करण्याचे निर्देश

पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता सर्व कामांचे नियमित ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले. जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्याबरोबरच ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना अधिक परिणामकारकरित्या अंमलात आणावी. धरणांतील गाळ काढून तो शेतीसाठी वापरण्यासाठी शेतकऱ्यांना पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

पाणी साठवण व्यवस्थेत सुधारणा

बैठकीत सध्या अनेक गावे टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर अवलंबून असल्याची माहिती देण्यात आली. काही गावांमध्ये नियमित दोन ते तीन टँकर सुरू असून भविष्यात पाणी साठवण व्यवस्थेत सुधारणा झाली नाही तर आणखी गावांना टँकरची गरज भासू शकते, काही ठिकाणी पूर्वीची कामे अपूर्ण आहेत ती तातडीने पूर्ण करावीत. संपूर्ण नदीपात्राचे वैज्ञानिक पद्धतीने रुंदीकरण, गाळ काढणे आणि पावसाळ्यापूर्वी नियोजनबद्ध कामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पाइपलाइनद्वारे पाणी वितरण

शेतकऱ्यांसाठी सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने पाइपलाइनद्वारे पाणी वितरण, प्रेशर इरिगेशन प्रणाली, ठिबक सिंचन आणि कार्यक्षम पाणी वापर तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देण्यात आला. बंद पाइपलाइन प्रणालीमुळे पाण्याची गळती कमी होऊन अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. पाण्याची बचत, जलसाठा वाढ आणि शाश्वत सिंचन व्यवस्थेमुळे शेती उत्पादनवाढीस चालना मिळेल असे बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!
Exit mobile version