Home नंदुरबार “मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत खाजगी क्रीडा अकादमींना मिळणार आर्थिक सहाय्य

“मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत खाजगी क्रीडा अकादमींना मिळणार आर्थिक सहाय्य

Private sports academies will get financial assistance under “Mission Lakshyavedh”

(नंदुरबार) महाराष्ट्र शासनाने राज्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि प्रतिभावंत खेळाडू घडवण्यासाठी “मिशन लक्ष्यवेध” ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, ऑलिम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंची तयारी करणाऱ्या खाजगी क्रीडा अकादमींना आर्थिक मदत दिली जाणार असल्याची, माहिती राज्याचे क्रीडा व युवक सेवा सहसंचालक सुधीर मोरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न करण्यात येत असून राज्यातील खेळाडूंसाठी अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, क्रीडा वेद्यकशास्त्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, ख्रेळाडूंसाठी करीअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी / विदेशी प्रशिक्षक व संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याच्या उद्देशाने शासनाने “मिशन लक्ष्यवेध” या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग, शुटींग, सेलींग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती या 12 क्रीडा प्रकारांच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन अशा संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करावयाच्या दृष्टीने संबधित अकादमी मधील खेळाडू, क्रीडामार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभुत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकन करण्यात येऊन, 35 ते 50 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘क’ वर्ग, 51 ते 75 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘ब’ वर्ग व 76 ते 100 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘अ’ वर्ग अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. ‘क’ वर्ग अकादमींना वार्षिक रुपये 10 लाख, ‘ब’ वर्ग अकादमींना रुपये 20 लाख व ‘अ’ वर्ग अकादमींना वार्षिक रुपये 30 लाख आर्थिक सहाय्य, पायाभुत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उन्नत करणे, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे आदि बाबींवर खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे.

यासाठी इच्छुक संस्थांनी अधिक माहिती व अर्जाचे नमुन्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक सेवा सहसंचालक सुधीर मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

0000000000

error: Content is protected !!
Exit mobile version