Home नंदुरबार जिल्हा आदिवासी महिला शेतकरी रजनी ताईंची माळरानावर फ़ुललेली शेती !

आदिवासी महिला शेतकरी रजनी ताईंची माळरानावर फ़ुललेली शेती !

(नवापूर) नंदूरबारपासून २६ किलोमीटरवरील निंबोणी गावाच्या रहिवासी रजनीताई कोकणी आणि त्यांच्या कुटूंबाने घेतलेल्या परिश्रमातून माळरानावर आमराईसह शेती फुलविली आहे. त्यांनी फुलविलेली शेती परिसरातील अन्य शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. निंबोणी गावात रजनीताई कोकणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. त्यांचे पती भाईदास कोकणी हे निवृत्त शिक्षक आहेत. भाईदास कोकणी नोकरीनिमित्त फिरस्तीवर असत. त्यामुळे शेतीची जबाबदारी रजनीताई यांच्यावर पडली. कोकणी दाम्पत्याकडील शेती माळरानाची, खडकाळ, टेकड्यांची आणि मुरबाड. सिंचनाची कोणतीही सुविधा नाही. रजनीताई यांनी अशा पीरस्थितीतही शेतीचा ध्यास घेतला आणि शेती फुलविण्याचा निर्धार व्यक्त केला.

सर्वप्रथम त्यांनी कुटूंबातील सदस्यांच्या मदतीने शेतीचे सपाटीकरण करून घेतले. वेळप्रसंगी स्वत:च हातात कुदळ घेवून श्रमाची कामे केली. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीचे सपाटीकरण केले. त्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर चालविणे शिकून घेतले. दीर्घ कालावधीच्या श्रमानंतर खडकाळ जमीन शेती कसण्यालायक झाली. त्यांनी सुरवातीला पावसाच्या पाण्यावर आधारित कोरडवाहू शेती केली. त्यानंतर त्यांनी विहीर खोदून सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण केली.

स्वत: राबून तयार केलेल्या शेतात राबण्याचा आनंद वेगळाच असतो. तो आनंद रजनीताई यांनी घेतला. या शेतात आता त्या गहू, सोयाबीन, तूर, मका, भुईमूग, आदी पिके त्या घेऊ लागल्या आहेत. तसेच कांदा, लसूण, मेथी, कोथिंबीर, वांगे, मिरची, वाल- पापडी आदी भाजीपाला पिकांचे उत्पादनही त्या घेवू लागल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी भाताच्या इंद्रायणी या वाणाची सुधारित तंत्रज्ञानाच्या आधाराने लागवड करून भात उत्पादनही घेतले आहे. शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणार्‍या राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी प्रकल्प अंतर्गत त्यांनी एक एकर क्षेत्रात आंबा लागवडीचा वाडी प्रयोग उत्कृष्टपणे राबविला आहे. त्यांनी उत्तम प्रजातीच्या आंब्याच्या ५० झाडांचे संगोपन केले आहे. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले असून परिसरासाठी एक उत्कृष्ट असे मॉडेल तयार केले आहे.

शेताच्या बांधावर सागाच्या दोनशे रोपांची लागवड केली आहे. सोबत बांबू, नारळ, चिकूच्या रोपांचीही लागवड केली आहे. आता चांगल्या प्रतीचे चिकू येवू लागले आहेत. भाजीपाल्याच्या नियोजनबद्ध लागवडीतून वर्षभर उत्पन्नाचा त्यांनी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार त्या विविध भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिंबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. वेळेची तसेच लागवड खर्चात बचतीसाठी सुधारित अवजारे व यंत्रांचा वापर त्या नियमितपणे करीत असतात. विशेष म्हणजे संपूर्ण शेती त्या सेंद्रिय पद्धतीने करतात. अशा पद्धतीने त्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा आदर्श परिसरातील शेतकर्‍यांसमोर ठेवला आहे.

त्यांनी कृषी विज्ञान केंद्र, नंदूरबार, या केंद्राच्या तांत्रिक सहकार्याने द्रौपदी महिला बचत गटाच्या माध्यमातून शेतकरी सुविधा केंद्र कार्यान्वित केले आहे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनासह शेतीविषयक प्रत्येक प्रशिक्षणाचा त्या लाभ घेतात. फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या त्या सदस्य आहेत. कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबारकडून राष्ट्रीय महिला किसान दिनाच्या निमित्ताने प्रयोगशील महिला या पुरस्काराने त्यांचा सन्मान झालेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून राष्ट्रीय केमिकल्स ऍण्ड फर्टिलायझर्सद्वारे त्यांचा नाशिक येथील कार्यक्रमात ‘प्रगतिशील किसान पुरस्कार’ देवून नुकताच सन्मान करण्यात आला आहे. रजनीताई या आदिवासी शेतकरी महिलेचे शेतीतील कार्य इतर शेतकरी व महिलांसाठी आदर्शवत ठरले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक विभागात विभागीय आयुक्त गमे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version