
पारंपरिक माती मणी उद्योगातील इंधनटंचाई, बाजारपेठेचा अभाव व शासनमान्यतेअभावी येणाऱ्या अडचणी संशोधनातून पुढे आणल्या. MSFDA आणि Indian Institute of Technology मुंबई यांच्या “आपले प्रश्न – आपले विज्ञान” उपक्रमांतर्गत नर्गुस मन्यार व मोगी वळवी या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून प्रशासनासमोर मांडणी केली.
महाविद्यालयाच्या पुढाकारामुळे प्रशिक्षण कार्यक्रमास चालना मिळाली तसेच उद्योगाला “नवीन उद्योग” म्हणून मान्यता मिळविण्यासाठी Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University येथील KCIIL विभागाशी स्टार्टअप प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात १७ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान तोरखेडा येथे टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असून मत्स्य व्यवसाय करणाऱ्या ग्रामीण युवक-युवतींना पूरक उपजीविकेचा पर्याय उपलब्ध करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
प्रशिक्षणाचे आयोजन महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था आणि ATMA नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून ग्रामविकास संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडे येथील नवोपक्रम व इनक्युबेशन कक्षाचा महत्त्वाचा पुढाकार आहे.
या प्रशिक्षणातून कौशल्य, सर्जनशीलता आणि उद्योजकता यांची सांगड घालत ग्रामीण युवक-युवतींना शाश्वत उत्पन्नाचे पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.