नवापूर तालुक्यात निती आयोगाच्या आकांक्षी तालुका कार्यक्रम (Aspirational Block Programme) अंतर्गत ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा औपचारिक शुभारंभ मा. गटविकास अधिकारी देविदास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या कार्यक्रमास निती फेलो क्षितिजा देशमुख तसेच सर्व विभागप्रमुख, क्षेत्रीय अधिकारी, पर्यवेक्षक तसेच अंगणवाडी सेविका, आशा, एएनएम, शिक्षक व विविध विभागांचे क्षेत्रीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली. आरोग्य, पोषण, शिक्षण, शेती, मूलभूत सुविधा व उपजीविका या प्रमुख क्षेत्रांतील विकास निर्देशांकांमध्ये लक्षित सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. निर्देशांकांचे सॅच्युरेशन, रिअल-टाईम डेटा मॉनिटरिंग आणि पुराव्यावर आधारित नियोजनाद्वारे ठोस व वेळबद्ध परिणाम साध्य करण्यावर विशेष भर देण्यात आला.
मा. गटविकास अधिकारी यांनी विभागांमधील समन्वय, जबाबदारी निश्चिती आणि नियमित आढावा यंत्रणा मजबूत करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. अधिकृत पोर्टलवर वेळेवर अहवाल सादर करणे, क्षेत्रीय पडताळणी करणे आणि शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणे यावर विशेष भर देण्यात आला.
क्षेत्रीय कर्मचारी हे शासन योजनांचे प्रत्यक्ष वाहक असल्याने त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करण्यात आले. सर्व विभागांनी एकत्रित व पारदर्शक पद्धतीने कार्य करण्याचा, समुदाय सहभाग वाढविण्याचा आणि स्थानिक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाययोजना राबविण्याचा सामूहिक संकल्प केला.
‘संपूर्णता अभियान 2.0’ अंतर्गत नवापूर तालुक्याचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. हा कार्यक्रम नवापूर तालुक्याच्या विकासाच्या नव्या टप्प्याची प्रभावी सुरुवात ठरणार आहे.
NITI Aayog @niti.aayog
#AspirationalBlockProgramme#SampoornataAbhiyan2#NITIAayog#collectorofficenandurbar
