Home महाराष्ट्र ‘सारथी’ने औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करावेत – मंत्री राधाकृष्ण...

‘सारथी’ने औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करावेत – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

‘Sarathi’ should start skill training programs as required by the industrial sector – Minister Radhakrishna Vikhe-Patil

मुंबई :- औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम ‘सारथी’ने  सुरू करावेत, सद्यपरिस्थितीत औद्योगिक तसेच सेवा क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ या कौशल्य विकास कार्यक्रमातून उपलब्ध होऊ शकते यासाठी  नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सारथी संस्थेच्या संचालकांची तसेच शासनाच्या संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नववी बैठक झाली.  बैठकीसाठी सारथी संस्थेचे संचालक मधुकर कोकाटे, उमाकांत दांगट, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सूरज मांढरे व इतर अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले की, समाजातील युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने कौशल्य प्रशिक्षण उपक्रम सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. सारथी संस्थेने यामध्ये पुढाकार घेतल्यास समाजातील युवक- युवतींना त्याची मोठी मदत होईल, या दृष्टीने सारथी संस्थेने प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सारथी संस्थेचे उपक्रम योजनांसाठी  संपूर्ण सहाय्य देण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचित केले आहे.  मुख्य सचिवांच्या समितीने देखील सारथी संस्थेला  यूपीएसी पूर्व प्रशिक्षणाकरीता  शंभर जागावरून चारशे तर एमपीएसीला ४००जागांवरून १ हजार जागा निर्माण करण्यास मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.

राज्य सरकारने २०२५-२६  आर्थिक वर्षात ५१५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी ४४२ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून, पुरवणी मागण्यांमध्येही ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला  आहे .

मंत्री विखे पाटील म्हणाले, सारथी संस्थेमार्फत राज्यात एकूण आठ वसतीगृह उभारण्यात येत असून, यापैकी सहा वसतीगृहांचे काम पूर्ण होत आहेत. या वसतीगृहांमध्ये सहा हजार विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था होईल. या वसतीगृहांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करुन येत्या शैक्षणिक वर्षापासून ही वसतीगृह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन द्यावीत तसेच वसतीगृहांचे व्यवस्थापन नामांकित संस्थांकडून करण्यात यावे, असे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.

सारथी संस्थेमार्फत सन २०२५-२६ मध्ये एकूण ३४ प्रकारच्या योजनामार्फत मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी समाजातील ४८ हजार ३८१ उमेदवारांना एकूण २२२ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.  तसेच स्पर्धा परीक्षा व पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमा मध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण १ हजार १७९ विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे.

तसेच १६४ देशांतर्गत शिष्यवृत्तीधारक, कौशल्य विकास विभागामार्फत प्रशिक्षित झालेल्या १० हजार २०९ अशा एकूण ११ हजार ९१५ प्रशिक्षार्थी विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे .

सारथी संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना व उपक्रमांचा तसेच उपलब्ध होत असलेला निधी याबाबत सविस्तर आढावा मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत घेतला. सारथी संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सूरज मांढरे यांनी सादर केली.

error: Content is protected !!
Exit mobile version