(नंदुरबार) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबई (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) च्या नंदुरबार जिल्हा कार्यालयामार्फत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून, संपुर्ण कागदपत्रानिशी 25 जलै 2026 पर्यंत जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावे असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. सी. चव्हाण यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या योजनेअंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमांमध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त केलेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातींमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींना महामंडळाकडून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. प्राप्त अर्जांमधून ज्येष्ठता व जास्त गुणक्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 03 ते 05 विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येईल. मुदतीनंतर किंवा उशिरा आलेल्या कागदपत्रांचा व अर्जांचा मुख्यालायामार्फत कोणताही विचार केला जाणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
यासाठी गुणपत्रक (मार्कशिट), शाळा सोडल्याचा दाखला (LC), रेशन कार्ड व आधार कार्ड, जातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट, दोन पासपोर्ट साईझ फोटो व जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज अशी आवश्यक मूळ कागदपत्रे दोन प्रतींसह आणणे अनिवार्य आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी वरील सर्व आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), नंदुरबार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे, टोकरतलाव रोड, नंदुरबार (फोन नं. 02564-210181 येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधून आपले अर्ज वेळेत सादर करावेत, असेही जिल्हा व्यवस्थापक श्री. चव्हाण यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
