‘ग्रामीण युवकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्वयंरोजगाराकडे वळणे ही आजच्या काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले. त्या भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार संस्था (RSETI), नंदुरबार यांच्या वतीने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले की, ‘DST व कौशल्य प्रशिक्षकांनी आपल्या कौशल्याचा प्रभावी वापर करून नवउद्योजक घडवावेत. ग्रामीण भागातील युवकांना नोकरी शोधण्याऐवजी उद्योजकतेकडे वळविणे अत्यावश्यक असून, दर्जेदार प्रशिक्षणातूनच हे शक्य होते.’ प्रशिक्षकांची भूमिका या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. नरेशकुमार संकले होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामीण स्वयंरोजगार संस्थेचे (महाराष्ट्र) संचालक श्री. जयानंद भारती, उमेदचे वरिष्ठ सल्लागार श्री. सुनील कस्तुरे तसेच ग्रामीण स्वयंरोजगार संस्थेच्या श्रीमती प्रीती पांडे उपस्थित होत्या.
आपल्या भाषणात डॉ. मित्ताली सेठी यांनी प्रशिक्षकांना पालकाच्या भूमिकेतून प्रशिक्षणार्थ्यांशी वागण्याचे आवाहन केले. प्रशिक्षक–प्रशिक्षणार्थी यांच्यातील विश्वास व मार्गदर्शनातूनच सक्षम उद्योजक घडतात, असे त्यांनी त्यांच्या प्रशासकीय अनुभवाच्या आधारे सांगितले.
यावेळी SBI RSETI (Rural Self Employment & Training Institute) संस्थेची नवीन इमारत व अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस RSETI नंदुरबार शाखेचे प्रमुख श्री. गणेश पठारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेले कौशल्य प्रशिक्षक, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. सुधीर सेवेकर तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा आठवडाभर चालणारा प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामीण युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यास उपयुक्त ठरणार आहे.
