Home महाराष्ट्र श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार -महिला व बालविकास मंत्री...

श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार -महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Shrivardhan beach to be developed as a 'Blue Flag Beach' - Women and Child Development Minister Aditi Tatkare

मुंबई :  रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या उपक्रमामुळे पर्यटनवाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा ‘ब्लू फ्लॅग बीच’ विकास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४ कोटींपैकी १.४० कोटी निधी प्राप्त झाला आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीस गती देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पर्यटन विभाग आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, श्रीवर्धन समुद्रकिनारा स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. ब्लू फ्लॅग मानांकन मिळवण्यासाठी स्वच्छ पाणी, प्रभावी कचरा व्यवस्थापन, सुरक्षितता उपाययोजना आणि पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. या सर्व निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात यावा.

तसेच, पर्यावरणीय निकषांची पूर्तता करत जागतिक दर्जाचा समुद्रकिनारा विकसित करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, तसेच पर्यावरण संवर्धनास हातभार लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

‘ब्लू फ्लॅग बीच’ मानांकनामुळे श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचे जागतिक स्तरावर ब्रँडिंग होऊन महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर त्याचे महत्त्व अधिक वाढेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!
Exit mobile version