अमरावती: धावपळीच्या जीवनशैलीत पत्रकारांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे अमरावतीतील पत्रकार, प्रसारमाध्यम कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आज एका विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये 226 पत्रकारांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.
पत्रकारिता हे अत्यंत आव्हानात्मक क्षेत्र आहे. सततची धावपळ, कामाच्या अनिश्चित वेळा आणि मानसिक ताण यामुळे पत्रकारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. ही गरज ओळखून पालकमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने उपस्थित राहून सर्वांची सखोल आरोग्य तपासणी केली. यामध्ये प्रामुख्याने रक्तातील चरबीचे प्रमाण तपासण्यासाठी संपूर्ण ‘लिपिड टेस्ट’, तसेच ‘फुल बॉडी चेकअप’ करण्यात आले. वाढत्या डिजिटल कामामुळे डोळ्यांवर येणारा ताण लक्षात घेऊन विशेष ‘नेत्र तपासणी’ आणि ‘दंत चिकित्सा’ शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात रूग्ण तपासणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार, मुख्यमंत्री सहायता निधीचे डॉ. श्याम गावंडे, ससंसर्गजन्य रोग विभागाचे डॉ. प्रज्ञा कडू, वैभव झुकरे, पल्लवी बोरकर, श्रद्धा कडू, टीबी हॉस्पीटलचे नितीन बेदरकर, शुभांगी उमरकर, दंत महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. अपूर्वा रोडे, डॉ. जान्हवी अंबाडकर, डॉ. पूजा शिंदे, डॉ. वेदश्री भडवे, डॉ. प्रितीका काळे, डॉ. अमिषा जुनघरे, डॉ. इशान पाटील, प्रमोद बकाडे, सुभाष दिघेकर, वैद्यकीय चमूतील डॉ.रूपाली ठाकरे, डॉ. प्रज्ञा चौधरी, डॉ. वैभव देशमुख, धीरज राऊत, संजीवनी सोनवणे, डॉ. नायब शेख आदी यांनी सहकार्य केले. शिबिरासाठी पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाचे शशांक चौरे यांनी पुढाकार घेतला.
या आरोग्य शिबिरामध्ये पत्रकारांना ‘आयुष्मान भारत कार्ड’ची सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी 48 पत्रकारांना आयुष्मान भारत कार्ड तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले. या कार्डमुळे पत्रकारांना भविष्यात विविध गंभीर आजारांवरील उपचारांसाठी शासकीय योजनेचा लाभ घेता येणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत हृदयविकाराचा झटका किंवा अन्य कारणांमुळे श्वास थांबल्यास व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी ‘सीपीआर’ ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते. या विषयावर यावेळी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉ. राधा सावदेकर प्रात्यक्षिक देऊन उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केले.
अशा स्वरूपाच्या आरोग्य तपासणीमुळे पत्रकारांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला. शिबिरामध्ये पत्रकारांनी स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
