
मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये जनगणना संचालनालयाचे सहसंचालक संतोष नरसिंह पायस यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. “जनगणना २०२७ ची तयारी” या विषयावर आधारित या मुलाखतीत जनगणनेचे राष्ट्रीय विकासातील महत्त्व, आगामी जनगणना प्रक्रियेचे नियोजन, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर तसेच नागरिकांचा सहभाग याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत दि. ५ ते ९ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘न्यूज ऑन AIR’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होईल. तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर आणि महासंचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ही मुलाखत निवेदक राजेंद्र हुंजे यांनी घेतली आहे.
भारतातील जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक धोरणांना दिशा देणारी अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे पायस यांनी यावेळी स्पष्ट केले. जनगणनेतून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध योजना आखते, संसाधनांचे नियोजन करते तसेच विकासाच्या प्राधान्यक्रमांना दिशा मिळते, असे त्यांनी सांगितले. या मुलाखतीत जनगणना २०२७ ही पूर्वीच्या जनगणनांपेक्षा अधिक तंत्रज्ञानाधारित आणि नागरिकाभिमुख कशी असेल, याची माहिती देण्यात आली आहे. “आमची जनगणना, आमचा विकास” या संकल्पनेमागील उद्दिष्ट स्पष्ट करताना त्यांनी नागरिकांचा सक्रिय सहभाग हीच यशस्वी जनगणनेची गुरुकिल्ली असल्याचे नमूद केले.
१ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या जनगणना प्रक्रियेचा आराखडा, घरगणना आणि लोकसंख्या गणना हे टप्पे, स्व-गणना (Self Enumeration) आणि प्रगणकाद्वारे घरभेटीची प्रक्रिया याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. अधिकृत पोर्टलवर नोंदणी, लॉग-इन प्रक्रिया, OTP पडताळणी, भाषा निवड, SE ID चे महत्त्व तसेच नागरिकांनी स्व-गणना करताना घ्यावयाची काळजी याविषयी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.