नाशिक : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन अन्न औषध प्रशासन व विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळित हंगामाचा शुभारंभ आज सकाळी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, ॲड. नितीन ठाकरे, दत्तात्रय पाटील, गणपतराव पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी सौ. व श्री. विक्रांत पाटील, सौ. व श्री. प्रशांत जमधडे, सौ. व श्री. प्रकाश चौधरी, सौ. व श्री. भरत काशीद, सौ. व श्री. विजय पाटील, सौ. व श्री. बाबूराव सोनवणे, सौ. व श्री. अरुण देशमुख, सौ. व श्री. श्रीराम आहेर, सौ. व श्री. आत्माराम पाटील, सौ. व श्री. रमेश शिंदे, सौ. व श्री. राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते गव्हाण पूजा झाली.
मंत्री श्री. झिरवाळ म्हणाले, की नैसर्गिक आपत्तींमुळे शेती संकटात सापडला आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची शासनाची भूमिका आहे. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येत आहे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊसाची लागवड करावी. परिसरात पायाभूत सोयीसुविधा वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. पावसाने विश्रांती घेताच रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
खासदार श्री. भगरे, कारखान्याचे चेअरमन श्री. शेटे म्हणाले की, परिसरातील शेतकऱ्यांनी अत्याधुनिक पद्धतीने ऊसाची लागवड करीत उत्पादन वाढवावे. यावेळी ॲड. ठाकरे, भगवान जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कारखान्याचे संचालक रावसाहेब पाटील यांनी स्वागत केले. अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सुखदेव जाधव यांनी आभार मानले. कारखान्याचे व्हाइस चेअरमन शिवाजी बस्ते, संचालक, सभासद, शेतकरी, कामगार उपस्थित होते.
