Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्याच्या रब्बी हंगामाला शाश्वत तंत्रज्ञानाची दिशा; २१ गावांत ‘शेतकरी क्षेत्रीय दिना’चा...

नंदुरबार जिल्ह्याच्या रब्बी हंगामाला शाश्वत तंत्रज्ञानाची दिशा; २१ गावांत ‘शेतकरी क्षेत्रीय दिना’चा यशस्वी प्रयोग

Sustainable technology for the Rabi season of Nandurbar district; Successful experiment of 'Farmers' Regional Day' in 21 villages

उत्पादन खर्च कमी करून जमिनीचे आरोग्य जपण्यावर भर; पीक संरक्षण, सेंद्रिय निविष्ठा आणि सिंचन व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष बांधावर मार्गदर्शन

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतीसमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढते तापमान, अनियमित पावसाचे स्वरूप आणि कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे उत्पादन खर्च वाढत असून शेतकऱ्यांचा नफा कमी होत आहे. या परिस्थितीत शाश्वत व वैज्ञानिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी ‘ॲक्शन फॉर ॲग्रिकल्चरल रिन्यूअल इन महाराष्ट्र’ (AFARM), पुणे संचलित एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प (IRDP) अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील २१ गावांमध्ये ‘रब्बी शेतकरी क्षेत्रीय दिन’ (सत्र २) यशस्वीपणे आयोजित करण्यात आला.

या उपक्रमात अफार्म संस्थातर्फे कृषी विस्तार अधिकारी रोहित लोहार, कृषी अधिकारी शिवाजी पावरा आणि प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप साळवे यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन आधुनिक व शाश्वत शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले. तसेच आत्मा विभागाचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक चंद्रकांत बागुल आणि कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी वसंत वळवी तसेच कृषी सहायक शशिकांत गावित यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.

तीन क्लस्टरमध्ये सूक्ष्म नियोजन:

प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी २१ गावांचे तीन क्लस्टरमध्ये विभाजन करण्यात आले.

क्लस्टर १: जळखे, रनाळे, काळंबा, वडाझाकण, पावला, कोठडे, वाघसेपा

क्लस्टर २: खैराळे, वाघाळे, सुतारे, हरिपूर, अजेपूर, नवागाव, श्रीरामपूर

क्लस्टर ३: लोय, वेळावद, भवानीपाडा, मालपूर, आर्डीतारा, वसलाई, भांगडा

या पद्धतीमुळे प्रत्येक गावातील स्थानिक समस्यांचा अभ्यास करून त्यानुसार मार्गदर्शन देणे सुलभ झाले.

पीक व्यवस्थापनावर भर:

क्षेत्रीय दिनाचा मुख्य उद्देश थेट शेत पाहणी करून पिकांच्या आरोग्याचा अभ्यास करणे हा होता. गहू, हरभरा आणि कांदा या पिकांमध्ये झिंक, फेरस, बोरॉन यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे कशी ओळखावी आणि योग्य वेळी त्यावर उपाय कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार पाणी व्यवस्थापनाचे महत्त्वही स्पष्ट करण्यात आले.

जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी सेंद्रिय उपाय:

कृषी अधिकारी शिवाजी पावरा यांनी सेंद्रिय शेतीच्या तत्त्वांवर भर देत जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी विविध पर्याय सुचवले.

जीवामृत व शेणकाला रबडी – उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी

S-9 कल्चर व नाडेप कंपोस्ट – काडीकचऱ्याचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर

हिरवळीची खते – ताग, धैंचा यांसारख्या पिकांमुळे जमिनीचा पोत सुधारतो

एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM):

कृषी विस्तार अधिकारी रोहित लोहार यांनी आर्थिक नुकसान पातळी (ETL) या संकल्पनेवर भर देत अनावश्यक रासायनिक फवारणी टाळण्याचे आवाहन केले. भांगडा येथील प्रगतशील शेतकरी सुनील वसावे यांच्या शेतात पिवळे-निळे चिकट सापळे, फेरोमोन ट्रॅप्स व प्रकाश सापळ्यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क आणि लसूण-मिरची अर्क यांसारख्या जैविक उपायांची माहिती देण्यात आली.

प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा:

भांगडा गावचे शेतकरी सुनील वसावे यांनी या शाश्वत पद्धतींचा अवलंब करून कीड नियंत्रणाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी केला आहे. ‘पूर्वी महागड्या औषधांवर अवलंबून राहावे लागायचे, पण आता जैविक उपायांमुळे खर्च कमी झाला आणि पिकाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली.’ असे त्यांनी सांगितले.

सिंचन व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर:

ठिबक, तुषार सिंचन आणि आधुनिक रेन पाईप तंत्रज्ञानाद्वारे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत कशी करता येते याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हवामान अंदाज आणि बाजारभाव जाणून घेण्यासाठी विविध कृषी मोबाईल अ‍ॅप्सचा वापर करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

नंदुरबार तालुक्यातील २१ गावांमध्ये राबविण्यात आलेला हा प्रयोग शाश्वत शेतीकडे वाटचाल करणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. सेंद्रिय व एकात्मिक शेती पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते, असा विश्वास कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला.

Action for Agricultural Renewal in Maharashtra – AFARM

#nandurbaragriculture#rabiseason#SustainableFarming#integratedpestmanagement#OrganicFarming#AgriInnovation#atma#FarmersEmpowerment

error: Content is protected !!
Exit mobile version