
तळोदा नगरपरिषद निवडणूक : भरवाड समाजाला प्रथमच प्रतिनिधित्वाची संधी?
वाला भरवाड यांच्या सूनेच्या उमेदवारीच्या मागणीने शहरात चर्चांना ऊत
तळोदा – नगरपरिषद निवडणूक रंगात आली असताना, यंदा प्रथमच भरवाड समाजाला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावोगावी फिरून उपजीविका करणारा हा समाज गेली चाळीस वर्षे तळोदा शहरात स्थायिक आहे. शांत, कष्टाळू आणि साध्या जीवनशैलीत जगणाऱ्या या समाजाला तळोदा शहराने केव्हा आपलेसे केले तेच कळले नाही, असा भावनिक सूर समाजात उमटताना दिसत आहे.
भरवाड समाजाचे मुख्य उत्पन्न गायी–म्हशी चारणे, दूध विक्री करणे आणि खेडोपाडी फिरून उपजीविका चालविण्यावर आधारित आहे. या मेहनती समाजाला अद्याप कोणतेही राजकीय प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची खंत व्यक्त होत असताना, यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत मात्र वेगळी हवा दिसत आहे.
नगरपरिषदेच्या वॉर्ड क्रमांक १ मध्ये वाला भरवाड यांनी आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सूनबाई कल्लू संजय भरवाड यांना उमेदवारी मिळावी, अशी अधिकृत मागणी भाजप पक्षाकडे केली आहे. तसेच त्यांनी आपल्या सुनेचा उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. वाला भरवाड हे स्वतः मेहनती, प्रामाणिक आणि होतकरू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कुटुंबातही परंपरेने कष्ट, शिस्त आणि विश्वासार्हतेचा वारसा पुढे आला आहे.
कल्लू संजय भरवाड यांच्या उमेदवारीची चर्चा रंगत चालली असून यामुळे वॉर्ड क्रमांक १ मध्ये नवा राजकीय समीकरणांचा खेळ दिसू लागला आहे. भाजपकडून भरवाड समाजाला संधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समाजात मात्र उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण असून, “पहिली वेळ, पहिली संधी” असा आवाज मोठ्या प्रमाणात ऐकू येत आहे.
येत्या काही दिवसांत पक्षाकडून अधिकृत तिकिटांची घोषणा होणार असल्याने, भरवाड समाजाचे प्रतिनिधित्व वास्तवात येते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.