Home महाराष्ट्र ‘हिंद- दी- चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम...

‘हिंद- दी- चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथे करण्यात आले आहे.

The 350th Shaheed Samagam program of 'Hind-Di-Chadar' Shri Guru Tegh Bahadur has been organized on February 28 and March 1 in Navi Mumbai.

कार्यक्रमासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

नवी मुंबई येथे होणाऱ्या हिंद -दी- चादर कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय धर्म जागरण समितीचे प्रमुख शरद रावजी ढोले, राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, सहसमन्वयक जसपालसिंग सिद्धू, राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हॅपी सिंग उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, या दोन दिवसीय कार्यक्रमात देश विदेशातून १८ ते २० लाख भाविक येणे अपेक्षित आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले असून, मुख्य मंडपात एकावेळी ८० हजार ते १ लाख भाविक आसनस्थ होतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी १५० पेक्षा अधिक विशेष एनएमएमटी बस सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. स्वतंत्र पार्किंग स्थळे ३८, विशेष तीन हेलिपॅडची व्यवस्था, २५ हजार भाविकांची निवास व्यवस्था, तात्पुरती स्वच्छतागृहे १ हजार पेक्षा अधिक, स्वच्छता कर्मचारी ५०० पेक्षा अधिक उपलब्ध असणार आहेत.

तसेच आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी ३०० पेक्षा अधिक असणार आहेत. तात्पुरती वैद्यकीय केंद्रे १५ पेक्षा अधिक, तात्पुरते एक आयसीयू केंद्र उपलब्ध करण्यात आले आहे. राखीव खाटा (जवळील रुग्णालये) ३५०, तर नजीकच्या रूग्णालयात राखीव आयसीयू खाटा ७५उपलब्ध आहेत. या दोन दिवसीय कार्यक्रमात १० हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवकांचा सहभाग असणार असल्याची माहिती डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

*शहिदी समागमाच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन*

*राज्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक*

राज्यस्तरीय समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की, ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास विभाग व शहिदी समागम राज्य समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई येथे भव्य शहिदी समागमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जम्मू-काश्मीरचे उप राज्यपाल मनोज सिन्हा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिग सैनी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, तामीळनाडू येथील भाजपा नेते अण्णामलाई, योग गुरु बाबा रामदेव, बागेश्वर धाम पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री, दीदी मा साध्वो ऋतंभरा उपस्थित राहणार आहेत.

तसेच शिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन तसेच भगत नामदेव संप्रदाय या समाजातील संत आणि रागी जत्थेदार उपस्थित राहणार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी नगर किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या शौर्य, धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि न्यायमूल्यांचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याची माहिती रामेश्वर नाईक यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाची संपुर्ण माहिती https://gurutegbahadurshahidi.com/home या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

error: Content is protected !!
Exit mobile version