
विकसित होईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारीशक्तीचा सन्मान महालक्ष्मीसरस प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केला. देशात सर्वात पहिल्या एक कोटी लखपतीदीदी महाराष्ट्रातच झाल्या पाहिजे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
देशात ई-कॉमर्स मोठ्या वेगाने वाढत आहे. उमेद मार्ट या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली असून या प्लॅटफॉर्मवर १००० पेक्षा जास्त वस्तू आहेत. राज्यातील नागरिकांनी उमेद मार्ट या प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी करावी, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्राम विकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी प्रदर्शनातील स्टॉलला भेट देत काही स्टॉलधारकांशी संवादही साधला. कार्यक्रमादरम्यान उमेदच्या माध्यमातून ६८ यशकथांवर आधारित निर्मित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उमेदमार्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर १००० वस्तू मान्यवरांच्या उपस्थितीत सूचीबद्ध करण्यात आल्या.