
भारतीय भाषांचे संवर्धन आणि मूल्याधिष्ठित पत्रकारिता यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबई हिंदी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित हिंदी पत्रकारितेच्या २०० व्या वर्षपूर्ती सोहळ्यास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, राजहंस सिंह, मुरजी पटेल, संजय उपाध्याय यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
हिंदी पत्रकारितेचा इतिहास समृद्ध असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जनजागृती घडवून आणण्यामध्ये तिचे मोठे योगदान राहिले आहे. ‘उदन्त मार्तण्ड’ या पहिल्या हिंदी वृत्तपत्रापासून सुरू झालेल्या प्रवासाने देशातील सामाजिक आणि राष्ट्रीय विचारप्रवाहाला दिशा दिली. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक नेत्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे कार्य केले, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
हिंदी ही तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून भाषा सर्वांना जोडण्याचे काम करते, असे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी यावेळी सांगितले.
हिंदी पत्रकारितेसाठी योगदान दिलेल्या वरिष्ठ पत्रकार गंगाधर ढोबळे, हेमंत तिवारी, कुमुद संघवी चावरे, विनीत कुमार सिंग, अवधेश व्यास यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रा.राममोहन पाठक तसेच गायक सुरेश शुक्ला यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.