पत्रकारितेत जेंडर सेन्सिटिव्हिटी (लैंगिक संवेदनशीलता) आणि जेंडर-न्यूट्रल भाषा वापरणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता यांनी ‘महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान’ या एकदिवसीय कार्यशाळेत केले.
पत्रकारितेतील शब्द आणि चित्रे समाजाच्या धारणा घडवतात. वारंवार वाचल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे लोकांची विचारसरणी तयार होते. त्यामुळे ‘कोणी गुन्हा केला’यापेक्षा ‘कोणावर गुन्हा झाला’यावर भर दिल्यास चुकीचा संदेश जातो, असे त्यांनी सांगितले. उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, ‘महिलेवर अत्याचार’ असे म्हणण्याऐवजी ‘पुरुषाने अत्याचार केला’असे लिहिल्यास गुन्हेगारावर लक्ष केंद्रित होते.
महिलांनी गुन्हा केल्यास त्याचे अतिनाट्यमय सादरीकरण केले जाते, तर महिलांविरुद्धचे गुन्हे अनेकदा कमी महत्त्वाचे दाखवले जातात, अशी टीकाही त्यांनी केली. महिलांच्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्या रूप, वैयक्तिक आयुष्य किंवा नैतिकतेवर भर दिला जातो, जे पूर्णपणे गैरलागू असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय गुन्हे नोंदवही (एनसीआरबी) च्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये महिलांविरुद्ध सुमारे ४.५ लाख गुन्हे नोंदवले गेले असताना, महिलांकडून होणारे गुन्हे अत्यल्प आहेत. तरीही माध्यमांमध्ये त्याचे अतिप्रदर्शन होते, असे श्रीमती गुप्ता यांनी सांगितले.
महिलांच्या यशाबाबतही माध्यमांमध्ये भेदभाव दिसून येतो. पुरुष खेळाडूंना अधिक प्रसिद्धी मिळते, तर महिला खेळाडूंच्या कामगिरीला तुलनेने कमी स्थान दिले जाते. यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो, असेही स्वाती गुप्ता यांनी सांगितले.
