Home महाराष्ट्र प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

The need to preserve honesty, service and dedication – Governor Jishnu Dev Verma

मुंबई: समाजासमोर असलेल्या विविध आव्हानांच्या पार्श्वभूमीवर प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण या मूल्यांचे जतन करण्याची गरज असून पुरस्कार विजेते हे या मूल्यांचे जिवंत उदाहरण आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.‘आफ्टरनून व्हॉइस’तर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित 18 व्या न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड्स 2026 कार्यक्रमात राज्यपाल श्री.वर्मा बोलत होते. यावेळी संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष पद्मश्री डॉ.संध्या पुरेचा, राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, ऑफ्टरनून व्हाईसच्या मुख्य संपादक डॉ.वैदेही तमन तसेच पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्यपालांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत उपस्थितांचे स्वागत केले. समाजातील लोकसेवा, कला-संस्कृती, पत्रकारिता, सामाजिक कार्य, शिक्षण आणि नवोन्मेष अशा विविध क्षेत्रांतील योगदानामुळे समाज समृद्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यपाल श्री. वर्मा यांनी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणारे “18 वे न्यूज मेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड्स 2026” हे व्यासपीठ समाजात उच्च आदर्श, जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीची भावना दृढ करणारे असल्याचे सांगितले.

यावेळी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे, राही भिडे, गायक हरिहरन, अभिनेत्री सुषमा देशपांडे, समाजसेवक दत्ता बारगाजे आणि अभिनेत्री झीनत अमान यांचे राज्यपालांनी विशेष अभिनंदन केले. तसेच 2026 मधील सर्व “न्यूजमेकर अचिव्हर्स” पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.

संगीताच्या माध्यमातून भारतीय संस्कृती समृद्ध करणाऱ्या हरिहरन यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगताना, माहिती अधिकाराद्वारे पारदर्शकता वाढविणाऱ्या विजय कुंभार यांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. तसेच योगेंद्र बांगर यांच्या ‘आजीबाईची शाळा’ या उपक्रमाचा उल्लेख करत शिक्षण कोणत्याही वयात व्यक्तीला सक्षम बनवू शकते, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राची परंपरा प्रगतिशील विचार, सामाजिक सुधारणा आणि सांस्कृतिक समृद्धीची असल्याचे अधोरेखित करत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आजही महाराष्ट्र उद्योग, प्रशासन आणि सामाजिक विकासात देशाचे नेतृत्व करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते गायिका उषा मंगेशकर, पद्मश्री गायक हरिहरन, पद्मश्री शेफ संजीव कपूर, अभिनेत्री सुषमा देशपांडे, पत्रकार राही भिडे आणि समाजसेवक दत्ता बारगजे यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

error: Content is protected !!
Exit mobile version