
राज्यात शेकडो वर्षापासून संतांनी आपल्या विचारातून समाज प्रबोधन करत पर्यावरणाचे महत्त्व सांगून पर्यावरणपूरक जीवनाचा संदेश दिला आहे. तो सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमातून केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात बेल वृक्षाचे रोपण करण्यात आले.
पर्यावरण विभागाचा हा उपक्रम खूप चांगला असून प्राचीन काळापासून आलेले वैष्णवांचे हे विचार गावोगावी जाऊन पोहोचविण्यात येत आहेत. सध्या जगासमोरील सर्वात मोठा प्रश्न हा पर्यावरणाचा आहे. हा प्रश्न कोणतीही एक व्यक्ती सोडवू शकत नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रारंभी मुख्यमंत्र्यांसमोर पर्यावरण जागृतीचा संदेश देणारे किर्तन, भारुड व पोवाड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी फुगडी खेळली. अमृता फडणवीस यांनी महिला कलाकारांसह देखील फुगडी खेळली. मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनीही हरी नामाच्या गजरात फुगडी खेळली. मुख्यमंत्री व सर्व उपस्थितांनी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत पावली केली.
या उपक्रमात संजय महाराज पाचपोर यांनी कीर्तन, संध्याताई साकी यांनी भारुड तर शाहीर माळी यांनी पोवड्यातून पर्यावरण जागृतीचे महत्त्वपूर्ण काम केले. यापुढे ही हे काम असेच सुरू ठेवावे असे सांगून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कीर्तन, भारुड ज्ञान जात असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार निधीतून जत विधानसभा मतदारसंघास भेट देण्यात आलेल्या कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केले. सोलापूर शहरातील उड्डाणपुलासाठी ५.६६ हेक्टर जागा सोलापूर महापालिकेकडे हस्तांतरण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तरुण भारत संवाद या वृत्तपत्राच्या वारीवरील विशेषांकाचे प्रकाशनही यावेळी त्यांच्या हस्ते झाले.
यावेळी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, गोपीचंद पडळकर, राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावर, विभागीय आयुक्त शितल तेली-उगले, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आदी उपस्थित होते.
#पंढरपूरवारी२०२६#आषाढीएकादशी#आषाढीवारी#पंढरीचीवारी#पंढरपूर#वारकरी#आरोग्यवारी#पर्यावरण#वृक्षारोपण#भारुड#किर्तन#पोवाडा#लोककला#महाराष्ट्रशासन#प्रदूषणजनजागृती#PandharpurWari2026#PandharpurDiaries#MahaDGIPR