नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घोडमणी गावाला जोडणारा पूल तातडीने दुरुस्त करीत सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून पूल उभारणीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी आज त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध आपत्तीग्रस्त गावांना भेट देत पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी श्री. सानप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
भूस्खलनाचा धोका असलेल्या जांभाची वाडी येथील ग्रामस्थांची भेट घेतली. या ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.
अल्पबचत भवनात सुरू झालेल्या तहसील कार्यालयाचे उद्घाटन आमदार श्री. खोसकर, जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्षा श्रीमती पाटणकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय स्थलांतर होणाऱ्या इमारतीला भेट देत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी आढावा घेतला.
