
विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. बृन्हमुंबई महानगरपालिकेनेही गती आणि गुणवत्तेसह मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाचे पुनर्बांधणी कार्य केवळ १५ महिन्यात व विहीत मुदतीच्या चार महिने आधीच पूर्ण केले आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. या पुलाचे नामकरण ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ असे करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतचा पूल हा नागरिकांसाठी खूप उपयुक्त ठरणारा आहे. सुरळीत वाहतुकीसाठी या पुलाची आवश्यकता आहे. त्यापार्श्वभूमीवर महानगरपालिकेने या पुलाचे काम गतीने पूर्ण केले याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेचे अभिनंदन केले. मुंबईकरांना अपेक्षित विकासकामे यापुढेही गतीने व दर्जदार होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.