सात कलमी कृती कार्यक्रमाने नागरिकांचे जीवन सुलभ आणि प्रशासन अधिक गतिशील बनेल !
The seven-point action plan will make the lives of citizens easier and administration more dynamic!
(नंदुरबार) शासनाच्या 100 दिवसांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुकर तसेच सुलभ होईल आणि प्रशासन अधिक गतिशील बनेल, असा विश्वास राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी आज व्यक्त केला.
जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून 100 दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या निर्देशांचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा (नंदुरबार), अनय नावंदर (तळोदा), कृष्णकांत कनवारीया (शहादा), तहसिलदार डॉ. जी. व्ही. एस. पवनदत्ता, उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक कपील सिंघल यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या सात कलमी कृती कार्यक्रम प्रभावी अंमलबजावणीसाठी पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली. 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमामुळे प्रशासन अधिक कार्यक्षम होईल आणि नागरिकांच्या सेवेसाठी अधिक पारदर्शक आणि जलद प्रक्रिया राबवल्या जातील.
महत्वाच्या निर्णयांमध्ये समावेश असलेल्या बाबी…
प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम
शासकीय कार्यालयांच्या संकेतस्थळांचे अद्ययावत व सायबर सुरक्षितता
उद्योजक आणि गुंतवणूकदारांसाठी सुलभ प्रक्रिया
सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता व मूलभूत सुविधा
शासनाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची देखरेख आणि कार्यवाही
विद्यार्थ्यांना मिळाले प्रोत्साहन !
महाज्योती संस्थेमार्फत जेईई/नीट/एमएचटी-सीईटी परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी 14 विद्यार्थ्यांना टॅब वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा आर्थिक समालोचन अहवाल पुस्तिका 2024 चे विमोचन करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले की,
“प्रशासनाने या कृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम सुरू केले आहे, यामुळे नागरिकांना वेगवान आणि पारदर्शक सेवा मिळेल.”