
काजू फळ पीक क्षेत्र वाढवण्यापासून ते विक्रीपर्यंत मूल्यवर्धन साखळी विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी उत्पादकता व साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी नियोजन करावे, काजू उत्पादन वाढवण्यापासून ते विक्रीपर्यंत मूल्यवर्धन साखळी विकसित करण्याकरिता राज्यात व्हिएतनाम व कंबोडियाच्या धर्तीवर अत्याधुनिक स्वयंचलित प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी नियोजन करावे, काजू उत्पादन वाढवून राज्य आत्मनिर्भर कसे होईल या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य काजू परिषद अध्यक्ष जयकुमार रावल यांनी परिषदेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिल्या.
मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे झालेल्या या बैठकीला महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे कार्यकारी संचालक राहुल कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, पणन विभागाचे सहसचिव विजय लहाने, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ चे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, अपेडा चे उपसरव्यवस्थापक वाघमारे तसेच शासन नियुक्त तज्ज्ञ संचालक मनीष दळवी, डॉ. परशराम पाटील, धनंजय यादव,रुपेश बेलोसे उपस्थित होते.