
राज्यातील एक हजार गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट यंत्रणा उभारणे तसेच वन्य प्राण्यांसाठी दोन रेस्क्यू सेंटर व दहा उपचार केंद्रे उभारण्यास राज्य वन्य जीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष तथा वन मंत्री गणेश नाईक यांनी मंजुरी दिली. हा प्रकल्प सुमारे २६० कोटी रुपयांचा असून मानवांवरील वन्यजीवांचे हल्ले रोखण्यासाठी तातडीने या उपाययोजना राबविण्याचे निर्देश मंत्री नाईक यांनी यावेळी दिले.
वन्य प्राण्यांच्या सुटकेसाठी २० ठिकाणी रॅपिड रेस्क्यू टीमची निर्मिती करण्यात येणार आहे. वन क्षेत्राच्या गावांमध्ये वन्य प्राण्यांपासून रक्षणासाठी वन विभागाच्या मदतीसाठी दोन हजार प्राथमिक प्रतिसाद दल (प्रायमरी रिस्पॉन्स टीम) तयार करण्यात येणार आहेत. शेतपिकांचे नुकसान करणाऱ्या हरण, माकडे, रान डुक्कर आदी प्राण्यांना पकडण्यासाठी दोन फिरती पथके स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच माकडे व रानडुकरांची संख्या नियंत्रणासाठी राज्यात दोन ठिकाणी नसबंदी केंद्रे उभारण्याचे प्रास्तावित आहे. या उपाययोजनांमुळे मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांच्या पिकाचेही नुकसान टळणार आहे. त्यामुळे या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देशही यावेळी मंत्री नाईक यांनी दिले.
बैठकीला आमदार समीर मेघे, प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास रेड्डी यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.