
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग यासारख्या नवतंत्रज्ञानामुळे रोजगार क्षेत्राचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, या बदलांना सामोरे जाण्यासाठी युवकांना आधुनिक कौशल्ये देणे ही काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे आयोजित वाय४डी (युथ फॉर डेव्हलपमेंट) ‘इंडिया @ २०४७ – पॉवर ऑफ स्किल अँड एज्युकेशन’ कार्यक्रमात सांगितले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, युथ फॉर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष प्रफुल निकम यांच्यासह विविध उद्योग समूहांचे प्रमुख उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. देशातील २५ कोटी नागरिक अतिदारिद्र्यातून बाहेर आले असून पायाभूत सुविधा, निवास, स्वच्छता आणि उपजीविकेच्या संधींमुळे सर्वसमावेशक विकासाला गती मिळाली आहे. महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या उद्दिष्टासाठी कौशल्य विकासाला विशेष महत्त्व असल्याचे सांगून त्यांनी युवकांच्या लोकसंख्यात्मक लाभाचे रूपांतर आर्थिक शक्तीत करण्यासाठी गुणवत्तापूर्ण कौशल्य प्रशिक्षण आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विविध उद्योग समूहांच्या सामंजस्य करारांच्या कार्यामुळे झालेल्या परिणाम अहवालांचे प्रकाशन करण्यात आले. समाजपरिवर्तनाच्या कार्यात योगदान देणाऱ्या सर्व उद्योग समूहांचे तसेच वाय४डी संस्थेचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.