Home नंदुरबार जिल्हा आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी

2
Toll waiver for vehicles of Warkaris traveling to Pandharpur for the Ashadhi Wari.

(नंदुरबार) आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व भाविक, वारकरी आणि पालख्यांच्या वाहनांना महाराष्ट्र शासनाने मोठी सवलत दिली आहे. वारीच्या कालावधीत भाविकांचा प्रवास सुलभ आणि अडथळामुक्त व्हावा यासाठी शासनाने 6 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 या पंढरपूरला जातेवेळी व परतीच्या प्रवासाच्या कालावधीत संपूर्ण टोल माफी जाहीर केली आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात पथकर माफीच्या विनामूल्य पास आणि स्टीकर्सचे वाटप सुरू करण्यात आले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

शासनाच्या परिपत्रकानुसार, हा टोल माफी पास केवळ पंढरपूरला जातानाच नव्हे, तर वारी संपवून परत येण्याच्या परतीच्या प्रवासासाठी देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. दिनांक 06 जुलै ते 29 जुलै, 2026 (जातीचा व परतीचा प्रवास) या कलावधीत टोल माफी असून जिल्ह्यातील व शहरातील सर्व पोलीस ठाणे, वाहतूक विभाग, किंवा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथे पास मिळतील. हे पास आणि स्टीकर्स मागणीप्रमाणे पूर्णपणे विनामूल्य (मोफत) उपलब्ध करून दिले जात आहेत.

वारी कालावधीत सर्व पथकर (टोल) नाक्यांवर कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि टोल माफी सवलतीचा लाभ विनाअडचण घेता यावा, यासाठी सर्व भाविकांनी आणि वाहनधारकांनी आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यातून, वाहतूक विभागातून किंवा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथून आपले विनामूल्य पास त्वरित प्राप्त करून घ्यावेत, असेही आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.