Tree plantation and environmental awareness activities were conducted enthusiastically in Nandurbar district on the occasion of World Environment Day.
(नंदुरबार) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या वतीने जिल्हाभर वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, वनवृक्ष बियाणे प्रदर्शन, सीड बॉल निर्मिती तसेच “एक पेड माँ के नाम” अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यानिमित्त मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तथा मा. वनसंरक्षक, नाशिक वनवृत्त श्री. गजेंद्र हिरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी निवास परिसरातील “सजिरी उद्यान” येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विभागीय वन अधिकारी डॉ. मकरंद गुजर, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती अपर्णा पाटील तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विविध शाळांमधील इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, शिक्षक, महिला बचत गट सदस्य आणि नागरिकांना वृक्षांचे महत्त्व, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, शहादा आणि तळोदा क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायत परिसर, शाळा, अंगणवाडी केंद्र, न्यायालय परिसर, रोपवाटिका तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.
यासोबतच सिसम, कांचन, आवळा, अंजन, कुसुम, बेहडा, बेल, खैर, बाभूळ, मोहगणी आणि महारुख यांसारख्या विविध वनवृक्षांच्या बियाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. अक्कलकुवा येथे बेहडा बियाण्यांपासून सीड बॉल निर्मिती उपक्रम राबवून भविष्यातील हरित संवर्धनासाठी प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचा संकल्प करत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाच्या या उपक्रमांमुळे पर्यावरण, वनसंपदा आणि जैवविविधता संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती निर्माण झाली.