Home महाराष्ट्र वंदे मातरम हे प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारे गीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

वंदे मातरम हे प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारे गीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

Vande Mataram is a song that inspires every Indian – Guardian Minister Jayakumar Gore

सोलापूर  :- वंदे मातरम हे गीत भारतातील प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणारे गीत आहे. देश प्रेमाची धगधगती ऊर्जा 150 वर्षांनंतरही या गीतातून आजही मिळते. 1875 साली बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले वंदे मातरम हे गीत स्वातंत्र्ययुद्धाचे राष्ट्रगान बनले व प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर भारताचा 150 बाय 100 फुटांचा मानवी नकाशा साकारण्यात आला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी श्रीमती रोहिणी तडवळकर, छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयाच्या डॉ. अग्रजा चिटणीस वरेरकर, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य ऍड. सुनंदा भगत, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा चारी- वालेकर, दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक प्रा. डॉ. व्ही. पी. उबाळे, डी. बी. एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य बी. एच. दामजी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून वंदे मातरम या गीताच्या वैभवशाली वारशाची आठवण देशाला करून दिली. 2047 साली भारतीयांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या जडणघडणीत वंदे मातरम हे गीत महत्त्वाचे ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आई प्रतिष्ठान आणि दयानंद शिक्षण संस्थेतर्फे शुक्रवारी दोन हजार विद्यार्थिनींनी सामूहिक वंदे मातरम गायन केले. यावेळी दोन हजार विद्यार्थिनींनी दीड एकर जागेत भारताचा मानवी नकाशा साकारला.

राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित राहून ‘वंदे मातरम’ चे गायन करीत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. कलाकार विपुल मिरजकर यांनी दोरीच्या साह्याने भारताचा मानवी नकाशा साकारला.

या उपक्रमात दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालय, डी. जी. बी. दयानंद विधी महाविद्यालय, डी.पी.बी.  दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन, दयानंद काशिनाथ असावा प्रशाला, भू. म. पुल्ली कन्या प्रशाला, मार्कंडेय हायस्कूल, सिद्धेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील दोन हजार विद्यार्थिनी उत्साहात सहभागी झाल्या होत्या.

error: Content is protected !!
Exit mobile version