
अमरावती: मेळघाटातील आरोग्य, पाणी पुरवठा आणि इतर समस्या. शासन स्तरावरून सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या सर्व उपाययोजना तातडीने अंमलात आणण्यात याव्यात, यासाठी येत्या आठवड्यात बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधला.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वात कर्जमुक्ती आठवण व मेळघाट संघर्ष यात्रेचा समारोप चिखलदरा येथे झाला. या यात्रेच्या निमित्ताने उद्योग मंत्री उदय सामंत आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी आनंदराव अडसूळ, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधला. मेळघाटमधील प्रश्नांची जाण असून येत्या काळात विशेष बैठक बोलविण्यात येईल. यामध्ये आरोग्य, पाणीपुरवठा, सिडको, स्कायवॉक आदी सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येईल. यात धोरणात्मक निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडेही दाद मागण्यात येईल. सध्या शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांना न्याय मागण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. सरकारकडून सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले राज्य शासनाने दोन लाख रुपयांची कर्जमुक्ती केली आहे. आदिवासींच्या प्रश्नांची दखल शासनाने घेतली असून हे प्रश्न लवकरच सोडविले जातील.आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले चुरणी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि 30 खाटांवरून 50 खाटांचे रुग्णालय करण्यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. या ठिकाणी सेवा देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र बजेट देण्यात येईल. राज्य शासनाने सिकलसेलमुक्त अभियान हाती घेतले आहे. नागरिकांनी तपासणीसाठी सहकार्य करावे. मेळघाटातील विविध समस्यांवर योग्य उपाययोजना करून कार्यवाही करण्यात येईल.
यावेळी बच्चू कडू यांनी चिखलदरा आणि मेळघाट परिसरातील विविध समस्यांची माहिती दिली.