Home शेती अक्कलकोस गावातील विकासाचा अनुशेष भरून काढणार: पालकमंत्री जयकुमार रावल

अक्कलकोस गावातील विकासाचा अनुशेष भरून काढणार: पालकमंत्री जयकुमार रावल

3
Will bridge the development gap in Akkalkos village: Guardian Minister Jaykumar Rawal

धुळे: अक्कलकोस गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, गावातील मूलभूत सुविधांचा अनुशेष भरून काढण्यासाठी  कृती आराखडा तयार करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

अक्कलकोस येथे आयोजित चावडी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार,  प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, सरपंच उज्जनबाई जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, राज्यपालांच्या दौऱ्याच्या निमित्ताने अक्कलकोसच्या विकासाला अधिक गती मिळाली आहे. यापुढे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गावाचे पालकत्व सोपविण्यात आले असून, दर चार महिन्यांनी विकास कामांचा आढावा घेतला जाईल. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांच्या समन्वयातून पायाभूत सुविधांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल.

देशाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास अपरिहार्य आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. लोकांप्रती उत्तरदायी राहून काम करणे हीच खरी लोकसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.

गावात नवीन डांबरी रस्ते, शाळा व अंगणवाडी इमारतींची दुरुस्ती व रंगरंगोटी, धरणापर्यंतचा रस्ता, साठवण बंधारे तसेच इतर विकासकामे पूर्ण झाली असून, उर्वरित रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली. आश्रमशाळेच्या नवीन इमारतीचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिले.

शबरी आवास योजनेअंतर्गत घरे, विहिरी आणि इतर विकासकामांमुळे गावात सकारात्मक बदल होत असल्याचे नमूद करत त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना चावडी संवादातून जाणून घेत त्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते बिरसा मुंडा सभागृहाचे लोकार्पण, साठवण बंधाऱ्याचे लोकार्पण तसेच विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना लाभांचे वितरण तसेच वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमानंतर त्यांनी लाभार्थी शामराव सोनवणे यांच्या घरी भेट देऊन संवाद साधला.