Home महाराष्ट्र लिंग गुणोत्तर संतुलित राखण्यासाठी अधिक दक्षतेने काम करा

लिंग गुणोत्तर संतुलित राखण्यासाठी अधिक दक्षतेने काम करा

Work more diligently to maintain a balanced gender ratio

अहिल्यानगर : जिल्ह्यातील मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर संतुलित राखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक दक्षतेने काम करावे. अनधिकृत सोनोग्राफी केंद्रांवर अचानक धाडी टाकून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच टीबी मुक्त भारत अभियान आणि पल्स पोलिओ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून आरोग्यविषयक शासकीय उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, अशासकीय सदस्य डॉ. सुधा कांकरिया यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी आहे, त्या गावांमध्ये विशेष जनजागृती बैठका आयोजित कराव्यात. मुलगा-मुलगी समानतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात यावी. तसेच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून अनधिकृत सोनोग्राफी केंद्रांविरुद्ध माहिती संकलित करावी आणि अचानक तपासणी मोहिमा राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी.

क्षयरोग निर्मूलनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील संशयित क्षयरुग्णांचे लवकर निदान आणि योग्य उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्यात टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत समाधानकारक प्रगती होणे अपेक्षित असून कामकाजात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी. तसेच क्षयरोग निर्मूलनासाठी आरोग्य यंत्रणेने समन्वयाने आणि परिणामकारक पद्धतीने कार्य करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्ह्यात २८ जून रोजी पल्स पोलिओ अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाची सर्व स्तरांवर व्यापक जनजागृती करण्यात यावी. अभियानासाठी आवश्यक लसींचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे, आरोग्य पथके तैनात करणे, दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष नियोजन करणे आणि एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काटेकोर नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

एचपीव्ही लसीकरण ही मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रतिबंधात्मक मोहीम असून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळवून देण्यासाठी शासनामार्फत ही मोहीम राबविण्यात येत आहे. १४ वर्षे पूर्ण झालेल्या व १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना या लसीकरणाचा लाभ दिला जात असून पालकांनी कोणतेही गैरसमज न बाळगता आपल्या मुलींना ही लस देऊन त्यांचे आरोग्य सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

#आरोग्यविभाग#HealthDept2026#अहिल्यानगर#Ahilyanagar#लिंगगुणोत्तर#GenderEquality#टीबीमुक्तभारत#TBFreedoms#पल्सपोलिओ#PulsePolioDrive

error: Content is protected !!
Exit mobile version