Home महाराष्ट्र मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे काम पूर्ण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे काम पूर्ण

Work on the third mountain tunnel in Maharashtra under the Mumbai-Ahmedabad Bullet Train project completed

नवी दिल्ली – मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे यशस्वी वेधन पूर्ण झाले असून, भारताच्या पहिल्या हाय-स्पीड रेल्वे मार्गिकेच्या उभारणीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आंबेसरी गावाजवळ या बोगदयाचे काम काम पूर्ण करण्यात आले आहे.

४१७ मीटर लांबी आणि १४.४ मीटर रुंदी असलेला हा बोगदा अत्याधुनिक देखरेख व सुरक्षा प्रणालींनी सुसज्ज करण्यात आला आहे. बुलेट ट्रेनच्या सुरक्षित आणि कार्यक्षम संचालनासाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक तांत्रिक सुविधा या बोगद्यात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या यशासह, महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांत तीन पर्वतीय बोगद्यांचे काम पूर्ण झाले असून, प्रकल्पाच्या तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक विभागातील कामाला वेग मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी एम टी -5 आणि एम टी -6 या बोगद्यांचेही यशस्वी वेधन पूर्ण झाले होते.

संपूर्ण उत्खनन प्रक्रियेदरम्यान संरचनात्मक स्थिरता, अचूक अंमलबजावणी आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक भूतांत्रिक उपकरणे आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणालींचा वापर करण्यात आला. सरफेस सेटलमेंट पॉइंट्स, थ्री डी टार्गेट्स, स्ट्रेन गेजेस आणि सिस्मोग्राफ्सच्या साहाय्याने कंपने, बोगद्याची स्थिरता आणि सभोवतालच्या संरचनांवर सातत्याने देखरेख ठेवण्यात आली. तसेच, वायुवीजन प्रणाली, अग्निसुरक्षा व्यवस्था, नियंत्रित प्रवेश आणि सतत भूतांत्रिक निरीक्षण यांसारख्या सर्वसमावेशक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात आल्या.

यापूर्वी २ जानेवारी २०२६ रोजी पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळ १.५ किलोमीटर लांबीच्या एमटी-५ बोगद्याचे वेधन पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर ३ फेब्रुवारी २०२६ रोजी एमटी-०६ या ४५४ मीटर लांबीच्या बोगद्याचे वेधन ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड’ च्या साहाय्याने यशस्वीरित्या पूर्ण झाले.

महाराष्ट्रातील सात पर्वतीय बोगद्यांपैकी एमटी -5, एमटी -6 आणि एमटी -7 या बोगद्यांचे वेधन आता पूर्ण झाले असून ते एकमेकांशी जोडले गेले आहेत. एम टी -8 या 350 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम यापूर्वीच ५ ऑक्टोबर २०२३ रोजी पूर्ण झाले होते.

सध्या एम टी -3 बोगद्याचे उत्खनन 80 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून एमटी -4 बोगद्याचे काम सुमारे 60 टक्के पूर्ण झाले आहे. एमटी -1 आणि एमटी -2 या बोगद्यांचे कामही वेगाने सुरू आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिका महाराष्ट्रातील बोईसर आणि गुजरातमधील वापी या महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यातून जात असून, या विभागातील बांधकाम कार्याला गती मिळाली आहे. वापी आणि बोईसर स्थानकांदरम्यान असलेल्या एमटी -8, एमटी -7 आणि एमटी -6 या तिन्ही डोंगराळ बोगद्यांचे उत्खनन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे भारतात प्रगत बोगदा-निर्मिती, आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान आणि उच्च-गती रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळत आहे. सुरक्षित, आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज अशा रेल्वे वाहतुकीचा मजबूत पाया या प्रकल्पाद्वारे उभारला जात आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version