
माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या विकासातील सहभाग अधिक सशक्त व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे अनिवार्य करणारा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामागील मुख्य उद्दिष्ट शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान मिळवणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, डिजिटल साधने, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देणे हे आहे.याच शासन निर्णयाच्या अनुषंगाने ‘मदतीचा हात – यशाची वाट!’ हा ध्यास मनात ठेवून मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, मा. शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्या प्रेरणेने व गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, विस्तार अधिकारी आरती शिंपी, वसंत जाधव व ज्ञानदेव केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा तालुक्यात ‘आठवणींमधून कृतज्ञतेकडे’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पुढील बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे –
सातत्य व बांधिलकी – दीर्घकालीन सहभागातून शाळेची सकारात्मक प्रतिमा निर्माण
स्पष्ट उद्दिष्ट व नियोजन – शैक्षणिक, भौतिक व सामाजिक विकास लक्षात घेऊन अल्पकालीन व दीर्घकालीन कार्ययोजना
शाळा–माजी विद्यार्थी समन्वय – मुख्याध्यापक, शिक्षक व माजी विद्यार्थ्यांमध्ये सातत्यपूर्ण संवाद
आर्थिक पारदर्शकता – जमा–खर्चाचा लिखित हिशेब व देणगीदारांचा विश्वास
स्वयंसेवी सहभाग – वेळ, कौशल्य, मार्गदर्शन स्वरूपातील योगदान
गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम – संगणक, ग्रंथालय, डिजिटल साधने, करिअर मार्गदर्शन
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर – WhatsApp, सोशल मीडिया गट, ऑनलाइन बैठका
तळोदा तालुक्यातील काही शाळांनी या उपक्रमातून अनुकरणीय उदाहरणे निर्माण केली आहेत-
जि.प. प्राथमिक शाळा कढेल येथे माजी विद्यार्थी संघाने शाळेस दोन नवीन संगणक भेट दिले. ग्रुप ग्रामपंचायत कढेल यांच्या सहकार्यातून वर्ग दुरुस्ती व फर्निचर उपलब्ध करून सुसज्ज संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आली. मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर या प्रयोगशाळेचे उद्घाटन मा. गटविकास अधिकारी श्री. राजू किरवे यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले.
जि.प. उच्च प्राथमिक शाळा दलेलपूर येथे माजी विद्यार्थी संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट वाटप करण्यात आले. प्रमुख देणगीदार श्री. राजू जगन प्रधान यांच्या सहकार्यामुळे क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.
जि.प. प्राथमिक शाळा दसवड येथे माजी विद्यार्थी संघाकडून सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस तसेच साउंड सिस्टिम भेट देण्यात आली. संघाकडून नियमित श्रमदानही केले जाते.
जि.प. उच्च प्राथमिक शाळा ढवळीविहीर येथे माजी विद्यार्थ्यांनी किचनशेड दुरुस्ती, CCTV बसविणे, पुस्तके उपलब्ध करून देणे व शाळेचे सुशोभन केले.
या उपक्रमामुळे –
- शाळेच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळाली
- विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा व आत्मविश्वास निर्माण झाला
- शाळा व समाज यांचा मजबूत दुवा निर्माण झाला
- आधुनिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी झाली
- मूल्य संस्कार व कृतज्ञतेची भावना वृध्दिंगत झाली
‘आठवणींमधून कृतज्ञतेकडे’ हा उपक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित न राहता, भावी पिढीसाठी प्रेरणादायी चळवळ ठरत असून, कालचे विद्यार्थी आज शाळेचे खरे आधारस्तंभ बनत आहेत, हे या उपक्रमाचे खरे यश आहे.