Home महाराष्ट्र शिंदखेडा तालुक्यातील १० हजार हेक्टर क्षेत्र बागायत करणार – पालकमंत्री जयकुमार रावल

शिंदखेडा तालुक्यातील १० हजार हेक्टर क्षेत्र बागायत करणार – पालकमंत्री जयकुमार रावल

10 thousand hectares of area in Shindkheda taluka will be irrigated – Guardian Minister Jayakumar Rawal

धुळे:  सुलवाडे-जामफळ उपसा जलसिंचन योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातील 54 गावांना जामफळ धरणातून 728 किलोमीटर लांबीच्या भूमिगत पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणी पुरवठा केला जाणार आहे. या योजनेमुळे तालुक्यातील 10 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून शिंदखेडा तालुका शंभर टक्के बागायत करणार असल्याचे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

बेटावद (ता. शिंदखेडा) येथे सुलवाडे-जामफळ योजनेअंतर्गत 54 गावांतील शेतांना थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या जलवाहिनी पूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी सभापती श्रीमती संजीवणी सिसोदे, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिचंन विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पवार, सहाय्यक अभियंता विशाल खैरनार, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री रावल म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सुलवाडे-जामफळ योजनेस गती मिळाली. कठीण परिस्थितीतही पीडीएन योजनेला मान्यता देण्यात आली. 2023-24 या कालावधीत योजनेच्या कामांना वेग आला असून सुमारे 200 किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. जामफळ धरणाला जोडणारी मुख्य नलीकेचे काम प्रगतीत असून एकूण साडेसातशे किलोमीटर लांबीच्या जाळ्यातून येत्या जून-जुलैपर्यंत 10 हजार हेक्टर क्षेत्र सिंचन क्षेत्राखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल तसेच यापुढची पिढी हा दुष्काळ नावाचा शब्द विसरुन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिंदखेडा तालुका 100 टक्के बागायत करण्याचा आमचा निर्धार आहे, असे सांगून त्यांनी उर्वरित मुख्य पाईपलाईनची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत थेट नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचा पुढील टप्पा राबविण्यात येणार असून त्यासाठी अहवाल व अंदाजपत्रके तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे शिंदखेडा तालुका प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून संपूर्ण परिसर बागायतदार होण्याचे स्वप्न साकार होत असल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

error: Content is protected !!
Exit mobile version