वर्धा : हिंगणघाटमध्ये उभारण्यात येणारे रुग्णालय हे केवळ हिंगणघाट शहरापुरते मर्यादित राहणार नसून परिसरातील ग्रामीण नागरिकांसाठीही आरोग्यसेवेचे महत्त्वाचे केंद्र ठरेल. या रुग्णालयामुळे नागरिकांना उपचारासाठी वर्धा किंवा नागपूरकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. हिंगणघाटच्या विकासाच्या दृष्टीने ४०० खाटांचे रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही ऐतिहासिक बाब ठरेल. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या दिशेने हे रुग्णालय महत्त्वाचे पाऊल असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
हिंगणघाट येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या ४०० खाटांच्या रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार समीर कुणावार, नगराध्यक्ष डॉ.नयना तुळसकर जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, संजय गाते, आरोग्य उपसंचालक डॉ.शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुमंत वाघ आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री.गोरे म्हणाले, महाराष्ट्राला विकसित, समृद्ध आणि निरोगी बनविण्याचे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली साकार करण्यासाठी शासन काम करीत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर सामान्य नागरिकाला उपचाराअभावी त्रास होऊ नये, हा शासनाचा संकल्प आहे. हिंगणघाटमध्ये ४०० खाटांचे रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज व्हावे, हे आमदार समीर कुणावार यांचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नातून साकारत असलेल्या या रुग्णालयाची नोंद हिंगणघाटच्या विकासाच्या इतिहासात निश्चितच होईल, असे ते म्हणाले.
हिंगणघाट परिसराचे श्रद्धास्थान असलेल्या आजनसरा देवस्थानच्या विकासाबाबतही मंत्री गोरे यांनी महत्त्वाची घोषणा केली. सध्या ‘क’ वर्गाचा दर्जा असलेल्या या देवस्थानला ‘ब’ वर्गाचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आजनसरा देवस्थानला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देऊ, असे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आजनसरा देवस्थानच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री गोरे यांनी केली.
आजच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य उपलब्ध होत आहेत. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातूनही गरजू नागरिकांना उपचाराचा लाभ मिळत आहे. त्यामुळे उपचारासाठी नागरिकांना खिशातील पैशांचा विचार करण्याची वेळ कमी झाली आहे. हिंगणघाट, समुद्रपूर आणि सेलू येथील पंचायत समित्यांच्या इमारतींची कामे सुरू आहेत. या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही श्री.गोरे यांनी दिली.
उपचारासाठी नागपूर-वर्ध्याला जाण्याची गरज भासणार नाही : मेघना साकोरे-बोर्डीकर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत मोफत व दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचवण्याचे काम सुरू आहे. आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळत आहेत. आमदार समीर कुणावर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हिंगणघाटमध्ये मोफत डायलिसिस आणि सिटीस्कॅन सुविधा आधीच सुरू झाली. आता ४०० खाटांचे रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहत असल्याने या भागातील रुग्णांना स्थानिक स्तरावरच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होती, असा विश्वास आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.
४०० खाटांचे रुग्णालय हिंगणघाटच्या विकासातील मैलाचा दगड : डॉ.पंकज भोयर
हिंगणघाट, समुद्रपूर आणि लगतच्या ग्रामीण भागातील सुमारे ३०० गावांचा विचार करता येथे मोठे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाची नितांत गरज होती. आमदार समीर कुणावार यांनी स्वतः मंत्रालयाच्या पातळीवर पाठपुरावा करून हा मोठा प्रकल्प मतदारसंघासाठी मंजूर करून आणला. अत्याधुनिक सुविधा असलेले ४०० खाटांचे रुग्णालय हिंगणघाटच्या विकासातील मैलाचा दगड ठरेल, पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले. नागरिकांना आरोग्य योजनांचा पूर्ण लाभ मिळावा यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरी भागात ‘आयुष्मान भारत कार्ड’ नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
हिंगणघाटकरांच्या स्वप्नांची पूर्ती : आ.समीर कुणावार
हिंगणघाटमध्ये ४०० खाटांचे रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे गेल्या २० ते २५ वर्षांपासून पाहिलेले स्वप्न अखेर साकार होत असल्याने हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. हा दिवस हिंगणघाटच्या विकासाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर हिंगणघाटसह समुद्रपूर आणि परिसरातील ग्रामीण नागरिकांना मोठा फायदा होईल. गंभीर आजारांच्या उपचारासाठी रुग्णांना इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही, स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार उपलब्ध होतील, असे आमदार कुणावार म्हणाले. यावेळी नगराध्यक्षा डॉ. नयना तुळसकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुमंत वाघ यांनी केले.
400 खाटांच्या रुग्णालयातील सुविधा
हिंगणघाट येथे आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नाने 400 खाटांचे रुग्णालय मंजूर झाले आहे. हे रुग्णालय जवळपास 30,766 चौरस मीटर क्षेत्रफळात 151 कोटी 10 लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक डिझाईन, छतावर सौर पॅनल, तापमान नियंत्रणासाठी जाळीदार रचना, रेन वॉटर हार्वेस्टिंग व मजले निहाय नवीन सुविधा व विभाग असणार आहे.
या चार मजली रुग्णालयामध्ये प्रतीक्षा कक्ष व माहिती केंद्र, आपत्कालीन विभाग, प्रगत निदान केंद्र, रक्तपेढी, विशेष उपचार कक्ष, प्रशासकीय विभाग, शस्त्रक्रिया गृह, तीव्र निगा विभाग, सर्जिकल आयसीयू, हाय डिपेंडन्सी युनिट, मेडिकल आयसीयू, स्त्रीरोग व बालसंगोपन विभाग, लेबर रूम व प्रसूती वॉर्ड, नवजात शिशू निगा विभाग, बालकांची तीव्र निगा विभाग, जनरल वॉर्ड आदी सुविधा राहणार आहे. रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा एमआरआय, सिटी स्कॅन, डायलासिस, आयसीयू, एनआयसीयू यासारख्या सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना स्थानिक स्तरावरच उपचाराच्या सुविधा उपलब्ध होईल.
