
सर्व विभागांनी विकास आराखड्यातील कामे नियोजित वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावीत. यासंबंधित ३४ हजार ७३२ कोटी रुपयांच्या विकास आरखड्यातील कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, सरोज अहिरे, हिरामण खोसकर, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिकचे सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यासंदर्भात एक महिन्यानंतर पुन्हा आढावा घेण्यात येईल. तोपर्यंत कामामध्ये गुणात्मक आणि प्रत्यक्ष प्रगती अपेक्षित आहे. विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय अत्यंत आवश्यक आहे. नाशिकमधील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची आणि रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी गती द्यावी. निर्धारित वेळेत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी. महानगर गॅस कंपनीने गॅस जोडणीच्या कामांसाठी नाशिक महानगरपालिकेशी समन्वय साधावा. सिंहस्थ कुंभमेळा राज्याच्या प्रतिष्ठेचा विषय असून त्यादृष्टीने तयारी वेळेत पूर्ण होईल यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. नाशिक रिंग रोड, साधुग्राम उभारणी, रेल्वे स्थानकांचा विकास, ४,५०० विशेष एसटी बसेस तसेच विस्तृत पार्किंग व्यवस्थेची कामे गतीने पूर्ण करावीत. ‘डिजिटल कुंभ’ संकल्पनेअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, ‘कुंभदूत’ एआय सहाय्यक, डिजिटल ट्विन, स्मार्ट पार्किंग, हरवलेल्या व्यक्तींचा शोध, तसेच एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून गर्दी आणि सुरक्षा व्यवस्थापन अधिक प्रभावी करावे. भूसंपादन, रिंग रोड, साधुग्राम आणि इतर महत्त्वाच्या नागरी सुविधा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण कराव्यात. केंद्र व राज्य शासन, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाने समन्वयाने काम करून सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित, भव्य आणि संस्मरणीय करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस